

आनंद परांजपे यांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजकीय धक्का
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. पक्षाचे सरचिटणीस तथा प्रवक्ता समन्वयक आनंद परांजपे यांनी पक्षाच्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा गुरुवारी (ता. १४) राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
राजीनामा पत्रात परांजपे यांनी पक्षाने दिलेल्या संधी आणि जबाबदाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील राजकीय वाटचालीसाठी आपण पदमुक्त होत असल्याचे नमूद केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असल्याने स्थानिक राजकारणात त्यांचे महत्त्व मानले जात होते. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा सक्रिय आणि आक्रमक चेहरा म्हणून परांजपे ओळखले जात होते. त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक गटात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील काही निर्णयांबाबत ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. स्थानिक पातळीवरील फेरबदल, संघटनात्मक पुनर्रचना आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते वेगळी राजकीय दिशा घेण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात होते.
दरम्यान, आनंद परांजपे लवकरच शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करू शकतात, अशी चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांसोबत त्यांच्या बैठका झाल्याचीही चर्चा आहे. मात्र, त्यांनी अद्याप पुढील राजकीय भूमिका अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून, पुढील काही दिवसांत ठाणे-पालघरच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.