

लोहार अपघातप्रकरणी
आमदार विक्रांत पाटील आक्रमक
महसूलमंत्र्यांच्या दालनातील बैठकीत अवैध वाहतुकीवर संताप
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ ः खारघर येथे ॲड. महेश लोहार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी आमदार विक्रांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात संबंधित विभागांची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीस महसूल विभाग, पर्यावरण विभाग, आरटीओ, पोलिस तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान आमदार विक्रांत पाटील यांनी खारघर शहरातून सुरू असलेल्या अवजड वाहनांच्या अवैध वाहतुकीबाबत प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. नागरिकांच्या भावना आणि वाढता असंतोषही त्यांनी महसूलमंत्र्यांसमोर मांडला.
केवळ वाहनचालकावर या प्रकरणात कारवाई करून थांबता कामा नये, तर संबंधित वाहन ज्या ठिकाणावरून अतिरिक्त गौण खनिज भरून निघाले, त्या मूळ मालकांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी विक्रांत पाटील यांनी केली. तसेच संबंधित व्यावसायिक संस्थांनी महसूल विभाग, पर्यावरण विभाग आणि इतर यंत्रणांच्या आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
धनाढ्य व्यावसायिकांच्या मनात आम्ही काहीही करू शकतो, अशी भावना निर्माण झाली आहे. त्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणांनाही योग्य संदेश देणे गरजेचे आहे, असे विक्रांत पाटील यांनी बैठकीत स्पष्ट केले.
व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेत संबंधित सर्व व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश दिले. गौण खनिज वाहतुकीसाठी आवश्यक पर्यावरण आणि इतर विभागांच्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, तसेच प्रत्यक्ष कामात नियमांचे उल्लंघन झाले का याची सखोल तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ‘एखाद्या युवकाचा जीव जात असेल आणि त्यामध्ये प्रशासकीय दुर्लक्ष कारणीभूत असेल, तर ते सहन केले जाणार नाही,’ असेही बावनकुळे यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील बैठक २० मे रोजी घेण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.