ठाणे महापौरांवर दमदाटीचा कामगाराचा आरोप

ठाणे महापौरांवर दमदाटीचा कामगाराचा आरोप
Published on

ठाणे महापौरांवर दमदाटीचा आरोप
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : पाणीपुरवठा विभागातील एका ठेकेदाराकडे काम करणाऱ्या जखमी कंत्राटी कामगाराने महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्यावर गंभीर आरोप करत सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपचारासाठी आर्थिक मदत, थकीत वेतन आणि न्याय मिळावा यासाठी महापौरांची भेट घेतल्यानंतर आपल्याशी अपमानास्पद भाषेत बोलण्यात आले तसेच दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा संबंधित तरुणाने केला आहे.
नीलेश पवार हा ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करत होता. एका कामादरम्यान झालेल्या स्फोटात तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे सांगण्यात येत होते. गेल्या दोन वर्षांपासून तो प्रशासकीय कार्यालये लोकप्रतीनिधी आणि संबंधित विभागाकडे मदतीसाठी पाठपुरावा करत होता. काही दिवसांपूर्वी नीलेशने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. यात त्याने महापौर कार्यालयात झालेल्या भेटीबाबत सविस्तर माहिती दिली. आपल्या आईसोबत महापौरांची भेट घेण्यासाठी गेलो असताना कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त दिसल्याने आश्चर्य वाटल्याचे त्याने म्हटले. नीलेशच्या म्हणण्यानुसार, काही वेळाने एका अधिकाऱ्याने महापौरांना भेटायचे असल्यास मोबाईल व बॅग बाहेर ठेवावी लागेल, असे सांगितले. त्याने मोबाईल आणि बॅग आईकडे दिली आणि त्यानंतर तो महापौरांच्या केबिनमध्ये गेला.
केबिनमधील चर्चेदरम्यान महापौरांनी आक्रमक भाषेत प्रश्न विचारल्याचा आरोप नीलेशने केला आहे. “तू एवढा मोठा झालास का?”, “व्हिडिओ बनवण्याचा अधिकार तुला कोणी दिला?”, “तुझी लायकी काय आहे?” अशा शब्दांत आपल्यावर संताप व्यक्त करण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. महापालिकेच्या ठेकेदाराकडे काम करणे ही चूक आहे का, की आपल्या समस्या लोकप्रतिनिधींसमोर मांडणे चुकीचे आहे, असा सवालही नीलेशने उपस्थित केला. एका सामान्य कामगाराला न्याय मिळवून देण्यात प्रशासन अपयशी असेल, तर लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी भावना त्याने व्यक्त केली. याचबरोबर संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणीही त्याने केली आहे.
----------
संबंधित तरुणाने मला नुकसानभरपाई मिळावी व पालिकेत कायस्वरूपी नोकरीची मागणी केली होती. त्यास चांगल्या खात्यात पालिकेत कंत्राटी पद्धतीवर नोकरी मिळवून देण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे यामध्ये कोणतीही दमदाटी करण्यात आली नाही. कुठलाही पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला नव्हता. त्याने केलेले आरोप चुकीचे आहेत.
- शर्मिला पिंपळोलकर, महापौर, ठामपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com