

स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिक आक्रमक
महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेत स्मार्ट मीटर न बसविण्याची मागणी
कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : महावितरणकडून नागरिकांना स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत कल्याण पश्चिमेतील वाडेघर परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. नागरिकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप करत रहिवाशांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा उपशहरप्रमुख मोहन उगले यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या तेजश्री कार्यालयात धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
वाडेघर येथील विहंग व्हीव्यू सोसायटीमध्ये महावितरणने जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या सोसायटीमध्ये ४० सदनिका आणि १६ गाळेधारक असून कोणत्याही रहिवाशाला विश्वासात न घेता ही प्रक्रिया राबविण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्मार्ट मीटरबाबत कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले असतानाही महावितरणकडून हुकूमशाही पद्धतीने स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. काही रहिवाशांनी लेखी स्वरूपात आम्हाला नवीन स्मार्ट मीटर नको, जुने मीटरच हवे आहेत, अशी भूमिका मांडूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी माजी नगरसेवक मोहन उगले यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उगले यांनी रहिवाशांसह महावितरणचे तेजश्री कार्यालय गाठून उपविभाग २ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन कराळे आणि कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांची भेट घेतली.
यावेळी स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांना पर्याय उपलब्ध करून द्यावा तसेच इच्छुकांना जुने मीटरच ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांनी संबंधित नागरिकांना एक महिनाभर स्मार्ट मीटरचे प्रात्यक्षिक दाखवून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती रहिवाशांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.