

विविध क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला!
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसोपचाराला केवळ वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले नाही, तर त्याला सामाजिक परिस्थितीच्या अभ्यासाची जोड दिली. त्यातून मानसोपचाराबाबतचा समाजातला पूर्वग्रह दूर करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. डॉ. नाडकर्णी आयपीएच, मुक्तांगण व अन्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते सक्रियपणे कार्यरत राहिले. त्यांच्या निधनामुळे विविध क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
...
डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केवळ एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणूनच नव्हे; तर एक प्रख्यात लेखक, कवी, नाटककार आणि विचारवंत म्हणून हजारो तरुणांच्या आणि नागरिकांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा दिली. या क्षेत्रातील त्यांचे योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.
- सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री
...
डॉ. आनंद नाडकर्णी साहित्य, मानसशास्त्र, समाजकारण आणि माणुसकी यांचा सुंदर संगम होते. मानसिक आरोग्याविषयी समाजात असलेला संकोच दूर करून त्यांनी हजारो कुटुंबांना नवसंजीवनी दिली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अभ्यासू, संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
...
मनोविकारतज्ज्ञ, लेखक, नाटककार, संगीतकार, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक भूमिकांमधून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी वैद्यकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. समाजातील मानसिक आरोग्याविषयीचे गैरसमज दूर करून संवेदनशीलतेने माणसांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
...
लेखन, नाट्य, संगीत, चित्रकला आणि संवाद यांच्या माध्यमातून मानवी मनाचे विविध पैलू डॉ. आनंद नाडकर्णी यांनी संवेदनशीलतेने समाजासमोर मांडले. पुस्तके, व्याख्याने, मुलाखती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याचा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.
- ॲड. आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री
...
आनंद नाडकर्णी स्वतःला मनोविकारतज्ज्ञ म्हणण्याऐवजी मनोविकासतज्ज्ञच म्हणत असत. त्यातच त्यांची सामाजिक दृष्टी जाणवायची. फक्त माणसांचे मनोविकार दूर करून भागणार नाही, तर त्यांचा विकासही झाला पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते.
- अच्युत गोडबोले, लेखक
...
डॉ. आनंद नाडकर्णी प्रिस्क्रिप्शनवर औषधांसोबत एखादे पुस्तक किंवा पॉडकास्ट ऐकण्यासाठी लिंक लिहून देत असत. त्यांच्या चेहऱ्यावरील आश्वासक भाव आणि बोलणे हेच खरे औषध पेशंटला मिळायचे, ज्यातून मानसिक शांतता लाभायची. त्यांची विवेकनिष्ठ विचारसरणी आत्मसात करून त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न आपण केला, तर तीच त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल. माझ्यासाठी त्यांची वैचारिक ऊर्जा कायम प्रेरणादायी राहील.
- डॉ. मानसी देशमुख, आयपीएच, पुणे
...
आनंद केवळ उत्तम डॉक्टर नव्हता, तर संवेदनशील लेखक, विवेकनिष्ठ विचारवंत आणि सेवाभावी मित्र होता. प्रत्येक कामात सर्वोत्तम योगदान देणे आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची त्याची वृत्ती प्रेरणादायी होती. आमच्या मैत्रीचा सुवर्णमहोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे स्वप्न होते; मात्र त्याच्या आकस्मिक निधनाने ते अपूर्ण राहिले. अनेकांच्या आयुष्यात आनंदाचे बीज रुजवणारा हा आनंदाचा महामेरू काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्याचे कार्य आणि विचार कायम जिवंत राहतील.
- डॉ. मंगेश बाणे
...
काही व्यक्ती दूर जातात; पण त्यांचा प्रकाश कधीच मावळत नाही. डॉ. नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्य जनजागृती, साहित्यनिर्मिती आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून असंख्य आयुष्यांना स्पर्श केला. त्यांच्या जाण्याने समाजमनाला दिशा देणारा संवेदनशील विचारवंत हरपला आहे.
- डॉ. मधुरा कुलकर्णी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.