नावाप्रमाणे जगलेला ‘आनंद’ - डॉ. राजेंद्र बर्वे

नावाप्रमाणे जगलेला ‘आनंद’ - डॉ. राजेंद्र बर्वे
Published on

नावाप्रमाणे जगलेला ‘आनंद’
- डॉ. राजेंद्र बर्वे

‘मला इतके काम असते की तणाव घेण्यासाठी वेळच मिळत नाही रे...’ असे म्हणणारा डॉ. आनंद नाडकर्णी म्हणजे आमचा आनंद पूर्ण आयुष्य आपल्या नावाप्रमाणेच जगला. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याला काय करायचे होते, हे त्याला ठाऊक होते. ते त्याने साध्य केले. पुढे व्यासंग वाढवला, एकाच वेळी मानसोपचारतज्ज्ञ, सल्लागार, लेखक, कवी, नाटककार, मुलाखतकार अशा सर्वच क्षेत्रांमध्ये तितक्याच उत्साहाने तो काम करत राहिला. वय वाढत गेले, शरीर वाढले, चालता येत नव्हते; पण त्याच्या चेहऱ्यावर कधीही तणावाची एक रेष दिसली नाही.
आनंद आणि माझी ओळख ४०-४५ वर्षांपूर्वीची. त्याने वैद्यकीयला अ‍ॅडमिशन घेत असल्याचे मला सांगितले. मला राजू म्हणणाऱ्या मोजक्या लोकांपैकी तो एक होता. मी म्हटले, अरे वा, मस्त! तेव्हा मी आणि डॉ. श्रीकांत जोशी आम्ही दोघे थोड्या लोकांना माहिती होतो. त्यामुळे मला खूप आनंद झाला, कारण आनंदसारखा तरुण मुलगा या क्षेत्रात येतोय. तो प्रगती करतच होता. एम.डी.ला पहिला आल्यानंतर त्याचे कौतुक झाले. सुरुवातीला तो दादरला खासगी प्रॅक्टिस करीत असे. त्यामुळे तेथे आमची भेट होत असे; पण तो तिथे दीड तास असायचा. मी म्हटले अरे, तुझे इथे मन रमताना दिसत नाही. अशीच प्रॅक्टिस करायची की आणखी वेगळे काही करायचे आहे? तो म्हणाला, ‘मला खूप काही करायचे आहे आणि जे मला करायचे आहे ते मला कळले आहे.’ हे शब्द इतके खरे होते, की तो पूर्णपणे तसा जगला. आपण जे करत आहोत आहे, त्याचे मूल्य आहे, त्यातून काय निष्पन्न होणार आहे, याची त्याला कल्पना होती. तशी त्याने आखणी केली होती.
आनंद आणि माझी नेहमी गाठभेट होत असे. अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाला आम्ही एकत्र होतो. अनेक किस्से मला आठवतात. अनेकदा लोक मला डॉ. आनंद नाडकर्णी म्हणून हाक मारत किंवा तुम्हीच डॉ. नाडकर्णी ना, असे म्हणत. यातील काही किस्से मी आनंदला सांगितले तेव्हा तो म्हणाला, ‘आपण दोघे खूप वेगळे दिसतो.’ तेव्हा मीच गमतीने म्हणालो, ‘हो, माझे टक्कल जेवढे चकाकते तितके अजून तुझे चकाकत नाही.’ तो म्हणाला, ‘चकाकेल हळूहळू...’ गमतीचा भाग सोडला तर एकदा त्याने विचारले, ‘तुला लोक माझ्या नावाने हाक मारतात, तेव्हा काय वाटते?’ मी म्हणालो, ‘तो मला माझा सन्मान वाटतो!’
आम्ही एक एज्युकेशन प्रोग्राम सोबत केला. मी म्हणालो, ‘आपण जे करतो ते लोकांना किती कळत असेल रे?’ तो म्हणाला, ‘कळते रे.’ या प्रोग्रामला त्याने ‘एज्युटेन्मेंट’ असे नाव दिले. तो म्हणायचा आपण एकत्र असलो की लोकांचे चांगले मनोरंजन होते. म्हणजे एज्युकेशनसोबत एंटरटेंमेन्ट अशी संकल्पना त्याने जुळवून आणली. पुढे आम्ही दोघांनी एकत्र अनेक कार्यक्रम केले. अनेकांना वाटायचे की, आम्ही तालीम करून आलो आहोत; पण आम्हाला त्याची गरज कधी भासली नाही. मला काय म्हणायचे आहे आणि त्याला काय विचारायचे आहे, हे आम्हा दोघांनाही माहिती असायचे.
आम्ही दोघेही एका क्षेत्रातील होतो; पण आमच्यात स्पर्धा अशी नव्हती. आमची लिखाणाची पद्धत वेगळी होती. तो ज्ञानेश्वरीवर बोलायचा आणि मी बुद्धावर बोलायचो. मी त्याला गमतीने म्हणायचो, ‘बुद्ध ज्ञानेश्वरांआधीचे आहेत. तसेच मी तुझ्या आधी आहे.’ अशा आमच्या गमतीजमती व्हायच्या.
त्याची पुस्तके, नाटके ही मनापर्यंत पोहोचणारी होती. कारण लिहिताना तो वाचकांना डोळ्यासमोर ठेवायचा. हे त्याचे वैशिष्ट्ये होते.
आमच्या गाठीभेटीचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी अलीकडेच घडलेला एक प्रसंग... एका कार्यक्रमासाठी आम्ही दोघे एकत्र येणार होतो. मी त्याला या वेळी मुद्दाम मला ‘स्ट्रेस आला तर काय करता’ असे विचारायला सांगितले. त्याने तो प्रश्न तसाच विचारला. त्यावर उलट मी त्याला विचारले, ‘तुला तणाव आला तर काय करतोस?’ तो म्हणाला, ‘मला इतके काम असते की तणाव येण्यासाठी वेळ नाही. आणि जे काम आपल्या आवडीचे असते तेथे तणावाला जागा नसते.’ खरेच आनंद हा त्याच्या नावाप्रमाणेच होता. खरे तर जगाला निरोप देण्याचे त्याचे वय नव्हते; पण कदाचित परमेश्वराला कोणता तरी ताण आला असावा की त्याने आनंदला आपल्याकडे बोलावून घेतले.
- डॉ. राजेंद्र बर्वे, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ, लेखक, प्रेरक वक्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com