कर्जतमधील वीजेचा प्रश्न आता सुटणार

कर्जतमधील वीजेचा प्रश्न आता सुटणार
Published on

कर्जतमधील विजेचा प्रश्न आता सुटणार
१५ दिवसांत वीजपुरवठा सुधारला नाही, तर कर्जत बंद; वीजग्राहक संघर्ष समितीचा इशारा
कर्जत, ता. २२ (बातमीदार) : महावितरणकडून वारंवार होणाऱ्या वीज खंडित समस्येमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी रविवारी (ता. २१) कर्जत शहरातील आयोजित विशेष बैठकीत नाराजी व्यक्त केली. कर्जत तालुका वीजग्राहक संघर्ष समितीच्या वतीने आयोजित या बैठकीत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. बैठकीत वीजग्राहक संघर्ष समितीचे प्रमुख कैलास मोरे यांनी महावितरणला १५ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास कर्जत बंद करून लाक्षणिक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मोरे यांनी दिला.
या वेळी समितीच्या रंजन दातार यांनी संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या विविध कामांचा आढावा घेतला. कर्जत तालुक्यासाठी १०२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, ६५ कोटी रुपयांची कामे टेंडर प्रक्रियेत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ३७ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरीची प्रतीक्षा असून, कर्जत शहराच्या भुयारी विद्युतीकरणासाठी १२५ कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगितले.
स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांची पूर्वसंमती व आवश्यक नोटीस देणे बंधनकारक असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

कोट
ऑगस्ट २०२४ मधील आंदोलनानंतर संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे १०० कोटी रुपयांहून अधिक निधीची कामे मार्गी लागली आहेत. कर्जत एक्स्प्रेस फीडरचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ६७ कोटी रुपयांची नवीन कामे सुरू होतील. त्यामुळे भविष्यात वीजपुरवठ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा आहे. मात्र, महावितरणने कामकाजात सुधारणा केली नाही, तर १५ दिवसांनंतर राज्याचे लक्ष वेधणारे मोठे आंदोलन उभारले जाईल. गरज पडल्यास व्यापारी फेडरेशनच्या सहकार्याने कर्जत बंदही करण्यात येईल.
- ॲड. कैलास मोरे, अध्यक्ष, वीजग्राहक संघर्ष समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com