

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : अनधिकृत बांधकामे, पर्यटन आणि पार्ट्यांसाठी नेहमी चर्चेत असलेल्या येऊरमधील एका पाणपोईची दयनीय अवस्था समोर आली आहे. वाटसरूंची तहान भागवणाऱ्या या पाणपोईच्या आतील भागावर मोठ्या प्रमाणात शेवाळ, बुरशी आणि घाण साचली आहे. सामाजिक कार्यकर्त्या के. वृषाली यांनी या पाणपोईचा व्हिडिओ समाज माध्यमांवर झळकवत ठाणे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्त सौरभ राव यांना निवेदन दिले असून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
येऊर परिसरातील ही पाणपोई अनेक वर्षांपासून नागरिकांच्या वापरात आहे. मात्र, तिची नियमित स्वच्छता, देखभाल आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाणपोईच्या आतील भागावर साचलेले शेवाळ आणि बुरशी पाहता तेथून पुरविले जाणारे पाणी पिण्यास योग्य आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या प्रकरणाला के. वृषाली यांनी ‘ऑपरेशन टीएमसी’ असे नाव देत ठाणे महापालिका प्रशासनाला थेट जाब विचारला आहे. त्यांनी आयुक्तांसह संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांना निवेदन पाठवून या पाणपोईची तातडीने पाहणी करण्याची मागणी केली आहे. समाज माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर नागरिकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
जलजन्य आजारांचा धोका
वृषाली यांच्या म्हणण्यानुसार, येऊरमधील या पाणपोईतून अनेक वर्षांपासून अस्वच्छ व दूषित पाणी पुरविले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दूषित पाण्यामुळे कावीळ, कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रो यांसारख्या जलजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. तसेच अस्वच्छ परिसरामुळे डासांची उत्पत्ती होऊन डेंगी आणि मलेरियासारख्या आजारांनाही खतपाणी मिळू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
पाच प्रमुख मागण्या
निवेदनात पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये संबंधित पाणपोई तत्काळ बंद करून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करणे, जुन्या यंत्रणेच्या जागी आरओ आणि यूव्ही फिल्टरयुक्त अत्याधुनिक पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, पाण्याची नासाडी रोखण्यासाठी ऑटो-कट सेन्सर बसविणे, शहरातील सर्व सार्वजनिक पाणपोईंचे संरचनात्मक आणि पाणी गुणवत्तेचे लेखापरीक्षण करून अहवाल जाहीर करणे; तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.