आम्ही शरद पवार साहेबांसोबतच राहणार

आम्ही शरद पवार साहेबांसोबतच राहणार
Published on

भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षातील खासदार फुटून अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले आहे. कोण कुठे जात असेल, त्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. मात्र, आम्ही सर्व खासदार शरद पवार साहेबांसोबत ठामपणे उभे आहोत, असा निर्वाळा त्यांनी दिला.
शहरातील खंडूपाडा येथील फेमस शोरमा दुकानातील चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर विषबाधा झालेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी खासदार म्हात्रे स्व. इंदिरा गांधी रुग्णालयात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. धर्मराव आत्राम यांनी शरद पवार गटातील पाच खासदार १२ डिसेंबरपूर्वी अजित पवार गटात प्रवेश करतील, असा दावा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना म्हात्रे म्हणाले, पक्षफुटीची ही केवळ चर्चा आहे. मी दाव्याने सांगतो, असा कोणताही विषय किंवा प्रस्ताव आमच्यासमोर आलेला नाही. धर्मराव आत्राम उद्धटपणे बोलत आहेत. त्यांना राजकारणात मोठे करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या संपर्कात नेमके कोण आहेत, हे त्यांनीच स्पष्ट करावे. आम्ही सर्व आठ खासदार शरद पवार साहेबांसोबत आहोत आणि पुढेही राहणार आहोत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा जो निर्णय असेल, तोच आमच्यासाठी अंतिम निर्णय असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवरही टीका
यावेळी खासदार म्हात्रे यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून येता, त्या पक्षाशी किमान पाच वर्षे तरी प्रामाणिक राहावे. त्यानंतर जिथे सन्मान मिळतो, त्या पक्षात जाऊन निवडणूक लढवावी, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com