

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच घेरावाडीत उजळला विजेचा दिवा!
कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम आदिवासीवाडीत प्रथमच वीज
पनवेल, ता. २२ (बातमीदार) : देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशके (७९ वर्षे) उलटल्यानंतर, पनवेल आणि नवी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका दुर्गम आदिवासीवाडीत अखेर विकासाचा प्रकाश पोहोचला आहे. पनवेल तालुक्यातील प्रसिद्ध कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या घेरावाडी या दुर्गम आदिवासीवाडीत महावितरणने आव्हानात्मक परिस्थितीत विद्युतीकरणाचे काम पूर्ण केले आहे. यामुळे गेली अनेक दशके अंधारात जीवन जगणाऱ्या येथील आदिवासी बांधवांच्या आयुष्यात एक नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे.
आपटा ग्रामपंचायत हद्दीतील घेरावाडी ही चार ते पाच किलोमीटर जंगलाने वेढलेली दुर्गम वाडी आहे. स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या या गावात वीज पोहोचविणे हे मोठे आव्हान होते. मात्र, महावितरणने दुर्गम डोंगराळ परिसरात ३२ उच्चदाब (एचटी) खांब, १६ लघुदाब (एलटी) खांब आणि एक रोहित्र उभारून हे काम यशस्वीपणे पूर्ण केले. शुक्रवारी (ता. १९) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते घेरावाडीतील नागरिकांना नवीन वीजजोडण्या प्रदान करण्यात आल्या. या वेळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पंचायत समिती अध्यक्षा रंजना वास्कर, कार्यकारी अभियंता दिवाकर देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वीज उपलब्ध झाल्यामुळे आता गावातील विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करणे सोपे होणार असून मोबाईल चार्जिंग, पंखे, घरगुती उपकरणे आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरणचे आभार व्यक्त केले आहेत.
आमदारांकडून महावितरणचे कौतुक
महेश बालदी यांनी घारापुरी बेटापर्यंत समुद्रातून वीज पोहोचविण्या प्रमाणेच घेरावाडीसारख्या दुर्गम भागात वीज पोहोचविण्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांचे कौतुक केले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच वीज मिळाल्याने घेरावाडीच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून या आदिवासी वाडीच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.