

उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच जूनपर्यंत ८० टक्क्यांहून अधिक मालमत्ता कर बिले वितरित करण्याचा विक्रम नोंदविण्यात आला आहे. याचबरोबर वर्षानुवर्षे प्रलंबित मालमत्ता कर नोंदींमधील त्रुटींवरही निर्णायक कारवाई केली आहे. ‘अचूक करप्रणाली, शून्य थकबाकी’ या ध्येयाने राबविलेल्या ‘प्रोजेक्ट मंथन’ अभियानामुळे ११९ कोटी रुपयांहून अधिकच्या अस्तित्वात नसलेल्या मालमत्तांची छाननी, हजारो नोंदींचे अद्ययावतीकरण आणि डिजिटल व्यवस्थापनाची अंमलबजावणी यशस्वी पार पडल्याने महसूल व्यवस्थापनात ऐतिहासिक बदल घडत आहेत.
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने राबविलेल्या ‘प्रोजेक्ट मंथन’ अभियानामुळे प्रथमच जूनअखेरीस शहरातील ८० टक्क्यांहून अधिक मालमत्ता कर बिले नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात महापालिकेला यश आले आहे. यापूर्वी अपूर्ण नोंदी, चुकीची माहिती आणि तांत्रिक त्रुटींमुळे बिल वितरण प्रक्रियेला विलंब होत होता. मात्र, व्यापक डेटा शुद्धीकरण मोहिमेमुळे ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक झाली आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पाच लाख रुपयांपेक्षा अधिक कर आकारणी असलेल्या मालमत्तांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात किंवा सापडत नसलेल्या १,१७४ मालमत्तांवरील तब्बल ११९.९९ कोटी रुपयांच्या थकबाकीचे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी सादर केला आहे. तसेच दुबार नोंदी असलेल्या ११४ मालमत्तांवरील १३.३६ कोटी रुपये, मोबाईल टॉवरशी संबंधित ५० मालमत्तांवरील १५.४३ कोटी रुपये आणि रस्ता रुंदीकरण, निष्कासित अथवा जीर्ण मालमत्तांशी संबंधित १६३ प्रकरणांतील २४.२९ कोटी रुपयांच्या मागणीची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय ‘मिसिंग ओनर नेम’ असलेल्या ६,३८३ मालमत्तांची माहिती अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
मालमत्ताधारकांना थेट मोबाईलवर संदेश
शहरातील एक लाख ८२ हजार ८०३ मालमत्तांपैकी ७६ टक्क्यांहून अधिक मालमत्ताधारकांचे मोबाईल क्रमांक प्रणालीमध्ये अद्ययावत केले आहेत. त्यामुळे थकीत कर, विविध योजना आणि महत्त्वाच्या सूचना थेट एसएमएस व व्हॉट्सअँपद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत.
प्रोजेक्ट मंथनमुळे मालमत्ता कर व्यवस्थापनात आमूलाग्र बदल घडत आहेत. उल्हासनगर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच जूनपर्यंत ८० टक्क्यांहून अधिक कर बिले वितरित झाली आहेत. अचूक डेटा, डिजिटल प्रणाली आणि पारदर्शक कार्यपद्धतीच्या माध्यमातून महसूलवाढीसह नागरिकांना अधिक सक्षम व जलद सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
- मनीषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका
आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ''जेक्ट मंथनअंतर्गत मालमत्ता कर विभागाने यंदा डेटाबेसमधील हजारो त्रुटी शोधून त्यांची दुरुस्ती करण्याचे मोठे काम केले आहे. प्रत्येक नोंद पडताळून, मालमत्तेचा मागोवा घेत आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आम्ही करप्रणाली अधिक विश्वासार्ह बनविण्याचा प्रयत्न केला.
- नीलम कदम, कर निर्धारक व संकलन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.