

मराठी बालवाड्यांऐवजी इंग्रजी नर्सरी
मराठी अभ्यास केंद्राचा निषेध
जुईनगर, ता. २४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने चालू शैक्षणिक वर्षापासून इंग्रजी माध्यमाच्या बालवाड्या सुरू करण्याचा घेतलेला निर्णय मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेविरोधातील गंभीर पाऊल असल्याचा आरोप करत मराठी अभ्यास केंद्राने या निर्णयाचा जाहीर निषेध केला आहे. मातृभाषेतून शिक्षणाची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० तसेच राज्याच्या मराठी भाषा धोरणात करण्यात आली असतानाही इंग्रजी माध्यमाच्या नर्सरी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने मराठी शिक्षण व्यवस्थेवर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असा इशारा भाषा अभ्यासकांनी दिला.
या पार्श्वभूमीवर रविवारी नेरूळ येथे रविवारी (ता. २१) मराठी अभ्यास केंद्राची पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीला मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, भाषा अभ्यासक डॉ. प्रकाश परब यांच्यासह सदस्य व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. प्रकाश परब यांनी कोणत्याही भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिक्षणातील भाषिक सातत्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातून एखादी भाषा बाजूला पडू लागली, तर तिच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो. त्यामुळे राज्यभाषा असलेल्या मराठीला शिक्षण व्यवस्थेतून दूर ठेवण्याचे परिणाम गंभीर ठरू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
बैठकीत या निर्णयाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम आणि संघटन उभारणी करण्याचा निर्धार करण्यात आला. वाशी, सीवूड्स, ऐरोलीसह नवी मुंबईतील विविध भागांत पालक, नागरिक आणि मराठीप्रेमींना एकत्र आणून लोकआंदोलन उभारण्याची घोषणा करण्यात आली.
मराठी भाषा, संस्कृती आणि मातृभाषेतील शिक्षणाच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्यास व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा मराठी अभ्यास केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी दिला असून, मराठी बालवाड्या टिकवण्यासाठी लवकरच पुढील कृती आराखडा जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कोट
येत्या काही दिवसांमध्ये महापालिका शाळांचा दर्जा सुधारत आहे. त्या धर्तीवर भविष्यात मला माझ्या मुलांना महापालिका मराठी शाळांमध्ये प्रवेश घायचा असेल, तर तो मला घेता येणार नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी बालवाटिका सुरु करणे योग्य असले तरी मराठी माध्यमांच्या शाळेत मात्र मराठी बालवाटिकाच सुरू ठेवण्यात आल्या पाहिजेत.
@ प्रणय चव्हाण रहिवासी नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.