

जिल्हा बँकेत महायुती विरुद्ध महायुती
उपमुख्यमंत्री शिंदेंनी थोपटले दंड; आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : दि ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने सहकार क्षेत्राच्या चौकटीपलीकडे जाऊन महायुतीतील राजकीय शक्तिप्रदर्शनाचे रूप धारण केले आहे. सर्वपक्षीय सहकार पॅनेलला पाठबळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दंड थोपटून पहिल्यांदाच मैदानात उतरले आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेल आहे. त्यामुळे ही निवडणूक ‘महायुती विरुद्ध महायुती’ अशी बनली आहे. दरम्यान, या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकाराची भूमिका बजावणार की परिवर्तन घडवणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दी ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक शनिवारी (ता. २७) पार पडणार आहे. यात सहकार विरुद्ध परिवर्तन या दोन पॅनेलमध्ये लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचारात आतापर्यंत स्थानिक नेते आघाडीवर होते. मात्र मंगळवारी (ता. २३) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सहकार पॅनेलच्या समर्थनार्थ भूमिका जाहीर केल्याने या लढतीत नवे राजकीय वळण आले आहे.
विरोधकांकडून शिवसेनेच्या (शिंदे गट) पाठिंब्याबाबत संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार पॅनेलच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. २१ संचालक पदांपैकी १० जागा आधीच बिनविरोध आहेत. त्यापैकी आठ जागांवर सहकार पॅनेलचे उमेदवार निवडून आले असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे स्पष्ट बहुमतासाठी केवळ तीन जागांची आवश्यकता असतानाही उर्वरित सर्व ११ जागा जिंकण्याचा दावा सहकार पॅनेलकडून केला जात आहे. या आत्मविश्वासामुळेच विरोधकांकडून संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
दरम्यान, राजकीय वर्तुळात मात्र चर्चा वेगळीच रंगली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे एकनाथ शिंदे सहकार पॅनेलसाठी उघडपणे मैदानात उतरल्यावर परिवर्तन पॅनेलच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री फडणवीसही सक्रिय होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
…………………
आगामी समीकरणांची चाचणी
जिल्हा बँकेची निवडणूक ही परंपरेने सहकार क्षेत्रापुरती मर्यादित मानली जात असली तरी यंदा ती जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची चाचणी ठरत आहे. ठाणे, पालघर आणि ग्रामीण भागातील प्रभावी सहकारी संस्थांचे मतदान, विविध राजकीय गटांचे संख्याबळ आणि भविष्यातील स्थानिक राजकारणाची दिशा या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. जिल्ह्यात सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोनच पक्ष प्रबळ आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. विशेष म्हणजे एकीकडे जिल्हा बँकेच्या निमित्ताने संपूर्ण शिवसेना शिंदे गट एकत्र असल्याचे दिसत असताना भाजपमध्ये मात्र उभी फूट पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.