

वलप ग्रामपंचायतीतील २,६६० बनावट जन्मनोंदीप्रकरणी तिघे अटकेत
प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांच्या प्रश्नाला जयकुमार गोरे यांचे लेखी उत्तर
पनवेल, ता. २४ (बातमीदार) ः तालुक्यातील वलप ग्रामपंचायतीमध्ये युजर आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून तब्बल दोन हजार ६६० बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रे तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिली. याप्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते.
वलप ग्रामपंचायतीच्या युजर आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात बनावट जन्मनोंदी तयार केल्याची बाब समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर संबंधित दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली, किती आरोपींना अटक झाली तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे, याबाबतचा प्रश्न ठाकूर आणि बालदी यांनी सभागृहात उपस्थित केला होता.
या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, वलप ग्रामपंचायतीच्या नागरी नोंदणी प्रणालीमधील काही पर्यायांचा वापर करून डिजिटायझेशन केलेल्या जुन्या जन्मनोंदींची पडताळणी करताना फेब्रुवारी २०२६ मध्ये तब्बल दोन हजार ६६० जन्मनोंदी बनावट असल्याचे निदर्शनास आले. यानंतर या सर्व बनावट जन्मनोंदी रद्द करण्यासाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत.
भविष्यातील सुरक्षेसाठी शासनाची पावले
भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी जन्म-मृत्यू नोंदणी करणाऱ्या सर्व निबंधकांना ऑनलाइन सीआरएस प्रणालीचा वापर करताना आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचेही गोरे यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रणालीची हाताळणी मानक कार्यपद्धतीनुसार करण्याबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.