तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना अमली पदार्थ पुरवणारा खाकीतील तस्कर गजाआड;

तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना अमली पदार्थ पुरवणारा खाकीतील तस्कर गजाआड;
Published on

अमली पदार्थप्रकरणी पोलिस अटकेत
तळोजा मध्यवर्ती कारागृहातील प्रकार
नवी मुंबई, ता. २४ (वार्ताहर) : तळोजा मध्यवर्ती कारागृहात ‘खाकी’ वर्दीला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. कारागृहातील बंदिस्त कैद्यांना अमली पदार्थ पुरवण्यासाठी स्वतःच्या पॅन्टच्या खिशात लपवून चरस आणि प्रतिबंधित गोळ्या घेऊन जाणाऱ्या कारागृह शिपायाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. खारघर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून शिपायाला बेड्या ठोकल्या आहेत.
कारागृह शिपायाचे नाव आदित्य शेलार (वय २४) आहे. तो चार महिन्यांपूर्वीच तळोजा मध्यवर्ती कारागृहात ‘कारागृह शिपाई’ म्हणून कामाला लागला. २२ जूनला दुपारी आदित्य दिवसपाळीसाठी कारागृहात प्रवेश करत होता. या वेळी मुख्य प्रवेशद्वारावर कारागृहाचे हवालदार देवेंद्र सोळंकी यांनी त्यांची अंगझडती घेण्यास सुरुवात केली. या वेळी त्याच्या खाकी रंगाच्या पँटच्या डाव्या बाजूच्या खिशात ४५,९२० रुपये किमतीचा ४९.९२ ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ सापडला. तसेच १,८०० रुपये किमतीचे नायट्रोझेपाम या प्रतिबंधित अमली गोळ्यांचे ३६ नग असे एकूण ४७,७२० रुपये किमतीचे अमली पदार्थ सापडले. कारागृह प्रशासनाने अमली पदार्थ जप्त करून कारागृह शिपायाला खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले. खारघर पोलिसांनी आदित्यच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
-----
कैद्यांना अमली पदार्थांचा पुरवठा करण्याचा डाव
हा शिपाई कारागृहातील न्यायबंदी (कैदी) यांना छुप्या पद्धतीने अमली पदार्थांचे सेवन आणि पुरवठा करण्यासाठी हे अमली पदार्थ आत नेत होता. कारागृहाच्या तटबंदीच्या आतच अमली पदार्थांचे रॅकेट चालवण्याचा हा अत्यंत गंभीर प्रयत्न सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. या रॅकेटमध्ये कारागृहातील इतर कोणी मोठे मासे सामील आहेत का, याचा कसून तपास खारघर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com