बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात शिवसेनेचे ‘हलगी वाजवा, अधिकारी जागवा’ आंदोलन;

बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात शिवसेनेचे ‘हलगी वाजवा, अधिकारी जागवा’ आंदोलन;
Published on

अतिक्रमणाविरोधात शिवसेनेचे ‘हलगी वाजवा, अधिकारी जागवा’ आंदोलन
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) ः एमआयडीसी क्षेत्रातील भूखंड क्रमांक सी-३बी वरील कथित बेकायदा बांधकाम, अनधिकृत शेड आणि पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणाविरोधात ठाकरे गटातर्फे बुधवारी (ता. २४) एमआयडीसी कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. ‘हलगी वाजवा, अधिकारी जागवा’ या घोषवाक्यासह पारंपरिक पोतराज वेशभूषेत करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे एमआयडीसी प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.
ठाकरे गटाचे उप शहरप्रमुख सिद्धाराम शीलवंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भूखंड क्रमांक सी-३बीचे मालक धर्मचंद कुलारिया यांनी मंजूर बांधकाम आराखड्याविरोधात अतिरिक्त बांधकाम केल्याचा आरोप केला. ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार, भूखंडावरील आवश्यक मार्जिन क्षेत्राचा बेकायदा वापर केला असून, बांधकामावर अनधिकृत शेड उभारले आहे. तसेच पालिकेच्या क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राउंड) क्षेत्रावर सुमारे ७० बाय ३० फूट आकाराचे नऊ गाळे उभारून त्यांचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित बांधकामे २०१८मध्ये करण्यात आली असून, त्यासाठी कोणतीही वैध परवानगी घेण्यात आली नव्हती. २०१९मध्ये एमआयडीसीने अतिरिक्त बांधकाम निदर्शनास आल्यानंतर बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली होती. मात्र त्या नोटीसमधील त्रुटी दूर न करता आणि अनधिकृत बांधकाम कायम असतानाच २०२०मध्ये संबंधित भूखंडाला ओसी देण्यात आले. त्यामुळे बेकायदा बांधकाम असताना ओसी कशाच्या आधारावर मंजूर करण्यात आले, याबाबतची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अतिक्रमणाबाबत वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही एमआयडीसी आणि पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई टाळली. पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पालिकेने एमआरटीपी कायद्यांतर्गत नोटीस बजावून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र नोटीस दिल्यानंतर तीन महिने उलटूनही एमआयडीसीकडून एफआयआर दाखल केला नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच निष्क्रियतेच्या निषेधार्थ ठाकरे गटाने एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात पारंपरिक हलगीच्या गजरात आंदोलन केले.
या आंदोलनात शहरप्रमुख महेश कोटीवाले, उप शहरप्रमुख समीर बागवान, विभागप्रमुख इस्माईल शेख, उप विभागप्रमुख जितू गायकवाड, शाखाप्रमुख जयेश कांबळे, आकाश शिंगटे, महाराज पिल्ले, दीपक क्षीरसागर, चांद शेख, मुज्जमिल शेख, धनराज कांबळे, अर्जुन दीपके, महेश शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

एमआयडीसीकडून लेखी आश्वासन
एमआयडीसीचे उप अभियंता गोगटे यांनी लेखी निवेदन देऊन सात दिवसांच्या आत संबंधित अतिक्रमणकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल तसेच त्यानंतर १५ दिवसांच्या आत अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असलेस तरी दिलेल्या मुदतीत कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com