

बदलापुरातही ‘प्रेमाच्या त्रिकोणा’तून हत्येचा संशय
दोन महिन्यांतच फॉरेन्सिकचा मोठा खुलासा; प्राजक्ता मेहेर मृत्यू प्रकरणात खुनाचा गुन्हा
बदलापूर, ता. २४ (बातमीदार) ः एरंजाड गावात नातेसंबंधांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. ९ एप्रिलला प्राजक्ता मेहेर (वय ३३) यांचा झालेला मृत्यू सुरुवातीला नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, मृत्यूच्या परिस्थितीवर संशय व्यक्त करत प्राजक्ता यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू नसून हत्या असल्याचा दावा केला होता. त्यानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळावरील नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले होते. या अहवालात प्राजक्ता मेहेर यांचा मृत्यू नैसर्गिक नसून नाक व तोंड दाबून गुदमरवून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
अहवाल प्राप्त होताच बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राजक्ता यांचे पती योगेश मेहेर आणि सासू अरुणा मेहेर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी यास दुजोरा दिला. प्राजक्ता मेहेर यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी योगेश मेहेर यांचे गावातीलच एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप करत, त्याच प्रेमप्रकरणातून आपल्या मुलीची व बहिणीची हत्या झाल्याचा गंभीर दावा केला आहे. तसेच या कथित कटात सासू अरुणा मेहेर, बहीण हर्षदा कोंडिलकर, चुलत भाऊ नरेश मेहेर आणि पूजा मेहेर यांचाही सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लोहगड येथे केतन अग्रवाल याची त्याच्या होणाऱ्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत कट रचून हत्या केल्याची घटना अद्याप ताजी असतानाच बदलापुरातही योगेश मेहेर यांनी आपली कथित प्रेयसीच्यासोबत संगनमत करून पत्नी प्राजक्ता मेहेर हिची हत्या केल्याचा दाट संशय प्राजक्ता यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. ज्या व्यक्तींवर संशय व्यक्त केला जात आहे, त्या सर्व व्यक्ती मृत महिलेच्या जवळच्या नात्यातील असल्याने या प्रकरणाने नातेसंबंधांवरील विश्वासालाच तडा गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
दोन महिन्यांतच उलगडले मृत्यूमागील सत्य
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे संबंधित फॉरेन्सिक अहवाल २०३२ पर्यंत प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याने सातत्याने केलेला पाठपुरावा, वरिष्ठ स्तरावरील समन्वय आणि तपासातील तत्परता यामुळे दोन महिन्यांत हा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे मृत्यूमागील सत्य लवकर समोर येण्यास मदत झाली. तपासालाही निर्णायक दिशा मिळाली आहे. सध्या पोलिसांकडून ताब्यातील संशयितांची कसून चौकशी सुरू असून, या कथित कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, प्राजक्ता मेहेर यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी या प्रकरणातील सर्व दोषींना कठोरात कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
----
कोणीही सुटणार नाही
हा केवळ संशयावर आधारित तपास नव्हता, तर वैज्ञानिक पुरावे आणि तथ्यांच्या आधारे पुढे नेलेला तपास होता. फॉरेन्सिक मिळायला उशीर लागणार होता. मात्र, आमच्या टीमने तेवढी तत्परता दाखवत दोनच महिन्यात हा फॉरेन्सिक रिपोर्ट मिळवला आहे. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. या प्रकरणात कोणालाही अभय दिले जाणार नाही. मृत्यूमागील संपूर्ण सत्य बाहेर आणण्यासाठी आणि कटात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. गुन्हा कितीही नियोजनबद्ध असला तरी कायद्याच्या हातातून कोणीही सुटणार नाही, असे सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.