

गणेशमूर्तींच्या किमतींना महागाईचा रंग
मातीपासून वाहतुकीपर्यंत खर्च वाढला; पर्यावरणपूरक मूर्तींना ७० टक्के मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. माती, रंग, पॅकिंग साहित्य, इंधन, वाहतूक आणि कारागिरांच्या मजुरीत झालेली वाढ यामुळे मूर्ती घडविण्याचा खर्च वाढला आहे. विशेषतः पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तींना मागणी वाढत असली, तरी त्यांची निर्मिती करणे मूर्तिकारांसाठी अधिक खर्चिक ठरत आहे.
गेल्या काही वर्षांत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडूची माती आणि कागदाच्या लगद्यापासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक मूर्तींकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
मुंबई, ठाणे येथील मूर्तिकारांच्या माहितीनुसार, यंदा सुमारे ७० टक्के ग्राहक पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी करीत आहेत; मात्र मागणी वाढत असतानाच उत्पादन खर्चही वाढल्याने मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत.
मूर्तिकारांच्या मते, पर्यावरणपूरक मूर्तींना प्रोत्साहन देताना त्यासाठी लागणारी माती, उत्पादनासाठी जागा आणि कुशल कारागीर सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे, अन्यथा पर्यावरणपूरक मूर्तींची मागणी असूनही वाढत्या खर्चामुळे त्यांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे.
कुशल कारागिरांची कमतरता
मूर्ती तयार करण्यासाठी कुशल कारागीर मिळणे ही मूर्तिकारांसमोरील प्रमुख अडचण ठरत आहे. स्थानिक कारागीर उपलब्ध नसल्यास बाहेरून कारागीर आणावे लागतात. त्यासाठी दररोज ९०० ते एक हजार रुपये मजुरी, तसेच राहण्याची आणि दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करावी लागते. माती मळण्यापासून मूर्ती घडविणे, बारकावे करणे आणि रंगकामापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मजुरीचा खर्च वाढला आहे. मातीच्या मूर्तींसाठी चार ते पाच महिने आधीपासून तयारी सुरू करावी लागते. मोठ्या मूर्तींसाठी बांबू, काड्या, गवत आदींचा वापर करून अंतर्गत आधार द्यावा लागतो. त्यामुळे मूर्तीचा आकार वाढला की उत्पादन खर्चही वाढतो.
एक फुटापासून चार फुटांपर्यंत मूर्ती
साधारण एक ते दीड फुटांच्या मातीच्या मूर्तींची किंमत दोन ते अडीच हजार रुपयांपासून सुरू होते. २१ इंचांची मूर्ती सुमारे चार ते साडेचार हजार रुपये, तर चार फुटांची मूर्ती १७ ते १८ हजार रुपयांपर्यंत जाते. विशेष कलाकुसर असलेल्या मोठ्या मूर्तींची किंमत एक ते दोन लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
रंग, पॅकिंगपासून वाहतुकीपर्यंत खर्च वाढला
गणेशमूर्तींसाठी लागणाऱ्या रंग, प्लॅस्टिक आणि अन्य साहित्याच्या दरातही वाढ झाली आहे. मूर्ती सुरक्षितपणे पॅक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या शिटची किंमत प्रतिकिलो १६० रुपयांवरून २२० रुपयांपर्यंत वाढली आहे. पॅकिंग टेपसह अन्य साहित्य महागल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. पेणमधून महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, अहमदाबाद तसेच परदेशातही मूर्ती पाठवल्या जातात. वाहतूक खर्चातही वाढ झाली असून काही ठिकाणी तो सुमारे १० हजारांवरून १३ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
पीओपीच्या मूर्तींचा परिणाम
मातीच्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्या तरी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत त्यांचा उत्पादन खर्च अधिक आहे. मागील वर्षी पीओपीच्या मूर्तींना परवानगी मिळाल्यानंतर ग्राहकांचा कल त्याकडे वळल्याने मातीच्या मूर्तींच्या विक्रीवर परिणाम झाल्याचे मूर्तिकार सांगतात. एका मूर्तिकाराकडे गेल्या वर्षी ४७ मातीच्या मूर्ती विक्रीविना शिल्लक राहिल्या होत्या.
मी १९७६ पासून गणेशमूर्ती घडवत आहे. पूर्वी मातीच्या मूर्तींची संख्या मोठी होती; मात्र आता जागेची अडचण, परवानग्या आणि वाढता खर्च यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. माती, रंग आणि इतर कच्चा माल महागला आहेच; पण सर्वात मोठी अडचण कुशल कारागीर मिळण्याची आहे. बाहेरून कारागीर आणला तर दिवसाला ९०० ते एक हजार रुपये मजुरी आणि त्यासोबत जेवणाची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे मूर्तीची किंमत वाढते.
- चंद्रकांत शंकर आंगरे,
मूर्तिकार, नायगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.