

दृष्टी नसली, तरी जिद्दीची उंच भरारी!
५० दृष्टिहीन गोविंदांचा चार थरांचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : दहीहंडीच्या थरारात यंदाही दृष्टिहीन आणि अंशतः दृष्टिहीन तरुणांचे गोविंदा पथक सहभागी होणार आहे. एकमेकांच्या आवाजावर, स्पर्शावर आणि विश्वासावर मानवी मनोरा रचणाऱ्या या पथकात ४० ते ५० तरुणांचा समावेश आहे. दहीहंडीच्या निमित्ताने त्यांनी चार थरांचा मनोरा रचण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यासाठी माटुंग्यात नियमित सराव सुरू आहे. कर्जत, कसारा, बदलापूर, वांगणी आणि विरारसह मुंबई परिसरातील विविध भागांतून सरावासाठी एकत्र येतात. कला संजीवन फाउंडेशनच्या वतीने हे पथक गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सवात सहभागी होत आहे. यंदा आधारिका फाउंडेशनच्या सहकार्याने हे पथक विविध दहीहंडी उत्सवात कौशल्य सादर करणार आहे. या पथकातील बहुतांश तरुण हे पूर्णतः किंवा अंशतः दृष्टिहीन आहेत. त्यातील अनेक जण महाविद्यालयीन शिक्षण घेत असून, काहींनी ज्युडो, क्रिकेट आणि कबड्डीसारख्या क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदविला आहे. क्रीडा क्षेत्रातील अनुभव आणि परस्परांवरील विश्वासाच्या बळावर हे तरुण दहीहंडीचा मानवी मनोरा रचतात.
दहीहंडीसाठी दर शनिवारी आणि रविवारी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत माटुंग्यातील दडकर मैदानावर सराव केला जातो. थर रचताना सहकाऱ्यांच्या स्पर्शावर, ठरावीक सूचनांवर आणि परस्परांतील समन्वयावर भर दिला जातो. सुरक्षिततेची खबरदारी घेत सराव केला जात असून, गेल्या वर्षी या पथकाने ‘ग्रो गोविंदा’मध्ये चार थरांचा मनोरा रचला होता.
----
नियमित सरावावर भर
४० ते ५० सदस्यांच्या पथकासाठी मानवी मनोरा रचणे हे मोठे आव्हान असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याची जागा, थरातील संतुलन, एकमेकांशी समन्वय आणि सुरक्षितता यासाठी नियमित सराव केला जात आहे. दृष्टी नसली तरी योग्य प्रशिक्षण, आत्मविश्वास आणि सहकाऱ्यांवरील विश्वासाच्या बळावर हे तरुण दहीहंडीच्या थरारात आपले स्थान निर्माण करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.