

अर्भक मृत्यूवर प्रशासनाचे स्पष्टीकरण
राजावाडीत दोन प्रकरणांत प्रसूतीपूर्वीच गर्भ मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात बुधवारी (ता. २६) झालेल्या तीन अर्भकांच्या मृत्यू प्रकरणाची वैद्यकीय पार्श्वभूमी रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केली आहे. त्या दिवशी झालेल्या १३ प्रसूतींपैकी दोन प्रकरणांत गर्भवती महिलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच गर्भमृत्यू झाल्याचे निदान झाले होते, तर तिसऱ्या प्रकरणात जन्मानंतर नवजात बाळाची प्रकृती गंभीर झाल्याने अतिदक्षता विभागात उपचार करूनही त्याचा मृत्यू झाला, असे प्रशासनाने शनिवारी (ता. २९) म्हटले आहे.
पहिल्या प्रकरणात ३७ आठवड्यांची गर्भवती रुग्णालयात दाखल होताच तपासणी करण्यात आली. गर्भाच्या हृदयाचे ठोके आढळून न आल्याने तातडीने सोनोग्राफी करण्यात आली. त्यात गर्भाशयातच गर्भमृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दुसऱ्या प्रकरणातील गर्भवती महिला ३३ आठवड्यांची होती. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने ही गर्भावस्था जोखमीची होती. नियमित तपासणीसाठी येण्याचा सल्ला देण्यात आला होता; मात्र त्यानंतर ती १५ दिवस पाठपुराव्यासाठी आली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतर रुग्णालयात आल्यानंतर करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये गर्भमृत्यू झाल्याचे निदान झाले. तर तिसऱ्या प्रकरणात ४० आठवडे दोन दिवसांची गर्भवती महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. प्रसूतीपूर्वी आणि त्यानंतर करण्यात आलेली एनएसटी तपासणी समाधानकारक होती; मात्र पुढील प्रक्रियेदरम्यान गर्भजलात बाळाची विष्ठा आढळून आली आणि गर्भाच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये घट दिसून आली. त्यानंतर तातडीने सिझेरियन करून बाळाचा जन्म घडविण्यात आला. जन्मानंतर नवजात बाळाची प्रकृती गंभीर असल्याने बालरोगतज्ज्ञांनी तातडीने पुनर्जीवन उपचार केले. श्वसनासाठी आवश्यक वैद्यकीय उपचार देऊन बाळाला नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले; मात्र सुमारे दोन तासांच्या उपचारानंतर त्याचा मृत्यू झाला.
वैद्यकीय नोंदींची तपासणी
उपलब्ध वैद्यकीय नोंदींच्या प्राथमिक तपासणीत उपचारात विलंब किंवा हलगर्जी झाल्याचे आढळून आले नसल्याचा दावा राजावाडी रुग्णालय प्रशासनाने केला आहे. दरम्यान, एकाच दिवशी झालेल्या तीन अर्भकांच्या मृत्यूमुळे प्रसूती विभागातील व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणातील सर्व वैद्यकीय नोंदींची तपासणी करण्यात येत असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.