लोकलमध्ये मोबाईल चोरताच ‘चोर-चोर’चा आरडाओरडा

लोकलमध्ये मोबाईल चोरताच ‘चोर-चोर’चा आरडाओरडा
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : लोकलच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, फोन चोरणाऱ्या किंवा हिसकावणाऱ्या दोन चोरट्यांना ठाणे रेल्वे पोलिसांनी पकडले. ऐरोली आणि दिवा रेल्वे स्थानकांवर घडलेल्या दोन स्वतंत्र घटनांमध्ये पोलिसांनी दोघांना अटक करून दीड लाखांचे मोबाईल हस्तगत केले. प्रवाशांनी प्रसंगावधान राखून केलेल्या आरडाओरड्यामुळे दोन्ही घटना उघडकीस आल्या.

घणसोली येथील दीपक चिंतामणी चौधरी (वय ३५) हे २७ ऑगस्ट रोजी कामानिमित्त ठाणे कोपरी येथे जात होते. रबाळे स्थानकावरून ठाणे लोकलच्या जनरल डब्यात चढून ते दरवाजात उभे होते. लोकल ऐरोली स्थानकावर पोहोचून सुरू होत असतानाच त्यांच्या पँटच्या उजव्या खिशातील मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मागे वळून पाहिले असता एक तरुण फलाटावरून पळताना दिसला. चौधरी यांनी तत्काळ ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा केला. ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी धाव घेत संशयिताला पकडले. सुमीत शिवमुरत मौर्या (वय २२, रा. ऐरोली) याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख ३० हजारांचा मोबाईल सापडला.

दुसऱ्या घटनेत दिवा येथील सायली बुधक (वय २४) या परिचारिकेसोबत मोबाईल हिसकावण्याचा प्रकार घडला. रात्रीच्या वेळी कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलने त्या दिव्याकडे येत होत्या. दिवा स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर उतरून त्या मोबाईलवर बोलत असताना लोकलच्या लगेज डब्याच्या दरवाजात उभ्या असलेल्या एका तरुणाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. लोकल सुरू होताच बुधक यांनी ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून सामानाच्या डब्यातील प्रवाशांनी तरुणाला पकडले. त्यानंतर मुंब्रा स्थानकावरील पोलिस चौकीत त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. चौकशीत त्याचे नाव अजय मुरारीलाल मीना (वय २२) असून तो राजस्थानातील असल्याचे समोर आले. पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मोबाईल मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com