

गतिमान ठाण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांची धाव
महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदेंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : विकासाच्या वाटेवर वेगाने धावणाऱ्या ठाण्याला आणखी गतिमान करण्याचा संदेश देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. ३०) ३२व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये धाव घेतली. शिंदे यांच्या सहभागाने धावपटू आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, धावताना त्यांनी इतरांना मागे टाकत आपला वेगही दाखवून दिला.
ठाणे महापालिकेच्या मॅरेथॉनला रविवारी सकाळी उत्साहात सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवत देशभरातून आलेल्या धावपटूंना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी ते स्वतः धावले. महायुतीतील आमदार, नगरसेवक तसेच ठाण्यातील कलाकारांनीही त्यांच्यासोबत धाव घेतली. ‘धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची’ ही यंदाच्या मॅरेथॉनची संकल्पना असून, ठाण्याच्या विकासाचा वेग आणि नागरिकांचा फिटनेस यांचा संदेश त्यातून देण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, खेळाडू, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करून धावपटूंना प्रोत्साहन दिले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यात विकासाची कामे वेगाने सुरू असल्याचे सांगितले. रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांसोबतच विद्यार्थी आणि खेळाडूंना चांगल्या सुविधा व व्यासपीठ देण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाणे महापालिकेने अनेक खेळाडू घडवले असून, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी महापौर, आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ठाण्यातून ऑलिंपिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू तयार व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
खेळामध्ये राजकारण नको
खेळामध्ये राजकारण आणू नये; खेळ हा खिलाडूवृत्तीनेच खेळला पाहिजे, असा संदेश शिंदे यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’च्या माध्यमातून युवक व खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करीत असून, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी, आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, विरोधी पक्षनेते अश्रफ शानु पठाण यांच्यासह नगरसेवक राजेश मोरे, संजय वाघुले, विकास रेपाळे, नम्रता जाधव भोसले, मीनल संख्ये, नारायण पवार, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, सुधीर कोकाटे, मुकेश मोकाशी, सर्व लोकप्रतिनिधी, खेळाडू, अभिनेता मंगेश देसाई तसेच दूरचित्रवाणी मालिकांमधील अनेक अभिनेते-अभिनेत्री आणि ठाणेकर स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.