पोलादपूर बसस्थानकातील सांडपाणी रस्त्यावर

पोलादपूर बसस्थानकातील सांडपाणी रस्त्यावर
Published on

पोलादपूर बस स्थानकातील सांडपाणी रस्त्यावर
‘आपली माती, आपली माणसं’ संघटना आक्रमक
पोलादपूर, ता. ३१ (बातमीदार) ः पोलादपूर तालुक्यातील मुख्य एसटी बस स्थानक परिसरात सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत ‘आपली माती, आपली माणसं’ संघटनेचे संस्थापक राज पार्टे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
पोलादपूर बस स्थानकातून तळकोकण तसेच पश्चिम महाराष्ट्राकडे ये-जा करणाऱ्या असंख्य प्रवाशांची दररोज वर्दळ असते. मात्र बस स्थानकातील सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करीत सर्व्हिस रोडवरून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे चित्र आहे. सांडपाण्यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
या समस्येची पाहणी करण्यासाठी राज पार्टे यांनी प्रत्यक्ष बस स्थानक परिसराला भेट दिली. या वेळी त्यांनी बस स्थानक प्रमुखांशी चर्चा करून सांडपाण्याच्या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.
पोलादपूर बस स्थानकाच्या विविध प्रश्नांवर आम्ही वेळोवेळी सातत्याने आवाज उठविला आहे. आता नवीन बस स्थानक होत असेल, तर सांडपाण्याचा प्रश्न आधी सोडविणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन, डेपो प्रशासन तसेच स्थानिक नेतेमंडळींनी येथे येऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहावी. परिसरात किती दुर्गंधी पसरली आहे याची जाणीव त्यांना होईल. सांडपाण्याचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर ‘आपली माती, आपली माणसं’ संघटनेच्या वतीने योग्य तो समाचार घेतला जाईल, असा इशारा संस्थापक राज पार्टे यांनी दिला.

प्रमुख मागण्या
- बस स्थानकातील सांडपाण्याचा योग्य व कायमस्वरूपी निचरा करावा.
- रस्त्यावर साचणारे सांडपाणी तातडीने हटवावे.
- दुर्गंधी व अस्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा.
- प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने बस स्थानक परिसर स्वच्छ ठेवावा.
- संबंधित प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना करावी.

या पाहणीवेळी ‘आपली माती, आपली माणसं’ संघटनेचे अध्यक्ष नीलेश कोळसकर, ग्रामीण कमिटी अध्यक्ष हरी पवार, ग्रामीण कमिटीचे पदाधिकारी, मुंबई कमिटीचे पदाधिकारी तसेच प्रवासीवर्ग उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com