

नवी मुंबई विमानतळावर गैरसाेयींची ‘उड्डाणे’
अपुरी वाहतूक अन् सुविधांअभावी प्रवाशांची काेंडी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३१ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन आठ महिने उलटले, तरी प्रशासकीय त्रुटींमुळे प्रवाशांचा प्रवास ‘सुविधां’ऐवजी समस्यांनीच भरलेला आहे. अपुऱ्या सार्वजनिक वाहतुकीमुळे मनमानीपणे आकारले जाणारे टॅक्सीचे अवाजवी भाडे, दिशादर्शक फलकांचा अभाव, महागडे खाद्यपदार्थ, बंद चार्जिंग पॉइंट आणि पाण्याच्या सुविधेतील अनियमिततेमुळे विमानतळावर गैरसाेयींची ‘उड्डाणे’ सुरू आहेत. प्रवाशांच्या या कोंडीबाबत विमानतळ व्यवस्थापनाशी संपर्क केला असता ते चौकशी करून माहिती देतो, असे सांगून हात वर करीत आहेत.
विमानतळाला जोडणाऱ्या एनएमएमटी आणि बेस्ट या सार्वजनिक बस सेवांच्या फेऱ्या अत्यंत कमी आहेत. त्यामुळे रात्री किंवा भल्या पहाटे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना खासगी कॅब किंवा टॅक्सींशिवाय पर्याय उरत नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन ॲपआधारित टॅक्सी सेवा आणि स्थानिक टॅक्सीचालक ‘सरचार्ज’च्या नावाखाली प्रवाशांना अवाजवी भाडे आकारून लुटत असून प्रवाशांच्या तक्रारींत वाढ झाली आहे. अधिकृत प्री-पेड टॅक्सी काउंटरची संख्या पुरेशी नसल्याने प्रवाशांची ही लूट सुरू आहे. महामार्गावरून विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येणाऱ्या रस्त्यांवर स्पष्ट दिशादर्शक फलक नसल्यामुळे अनेक वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. त्यामुळे ऐनवेळी पार्किंग किंवा डिपार्चर गेट शोधताना प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-----------------------------------------
खानपान, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
टर्मिनल परिसरातील फूड कोर्टमध्ये पदार्थांचे दर अत्यंत चढे आहेत. सर्वसामान्यांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे; मात्र ही सुविधा अनेकदा सुरू नसते. मोबाईल चार्जिंग पॉइंट काही भागांत बंद असतात. सुरुवातीच्या टप्प्यात तांत्रिक नियोजन नसल्याने पीक अवरमध्ये चेक-इन काउंटरवर लांबलचक रांगा लागत आहेत. तसेच विमान उतरल्यानंतर सामान मिळण्यासाठी ३० ते ४५ मिनिटे लागत असल्याचे समाजमाध्यमांवर प्रवाशांनी सांगितले.
-----------------------------------------
तातडीने हस्तक्षेपाची मागणी
‘जागतिक दर्जाचे विमानतळ उभारताना प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधांचा प्राधान्याने विचार होणे गरजेचे होते. सिडको, महापालिका आणि विमानतळ प्रशासनाने तातडीने समन्वय साधून बसफेऱ्या वाढवाव्यात आणि टॅक्सींच्या दरावर नियंत्रण आणावे,’ अशी मागणी प्रवासी करीत आहेत. प्रवाशांत असंतोष वाढत असून सिडको व विमानतळ व्यवस्थापन या समस्यांवर काय तातडीचे उपाय योजते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-------------------------------------------------
भारत टॅक्सी कधी सुरू होणार?
जुलैमध्ये भारत टॅक्सीचे गाजावाजा करून उद्घाटन झाले. त्यानंतर १५ ऑगस्टपासून टॅक्सी सेवा प्रवाशांना प्रत्यक्षात मिळणार होती; मात्र अद्याप ही सेवा नवी मुंबई विमानतळावरून सुरू झालेली नाही. काही तांत्रिक कामे अर्धवट असल्यामुळे ही सेवा सुरू होण्यात दिरंगाई होत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाला काळी-पिवळी टॅक्सीदेखील सुरू करण्यात अपयश आले आहे. याबाबत विमानतळ व्यवस्थापनाने पनवेल आरटीओला पत्रव्यवहार केला आहे. त्यानंतरदेखील ही सेवा सुरू न झाल्याने खासगी टॅक्सीचालकांचे फावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.