

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : शहरातील रुग्णांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी महापालिकेची रुग्णालये खासगी संस्थांमार्फत चालवण्यात येणार आहेत. त्यापैकी ऐरोली येथील महापालिका रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. रुग्णांवर होणाऱ्या उपचारानुसार दर निश्चित केले जाणार आहेत. रुग्णांवरील उपचारामागे संस्थेला पैसे देण्यात येणार आहेत. हा ठराव गेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर इतर रुग्णालयांमध्ये तो राबवण्याचा विचार आहे.
नवी मुंबई महापालिकेने बेलापूर, नेरूळ, वाशी, घणसोली, तुर्भे आणि ऐरोली या भागात सर्वसामान्य रुग्णालये आणि माताबाल संगोपन केंद्र सुरू केले. रुग्णालय व्हिजनअंतर्गत खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर रुग्णालयाच्या इमारती उभ्या केल्या. तसेच तज्ञ्जांच्या मार्गदर्शनानुसार अत्याधुनिक उपकरणेदेखील खरेदी केली. मात्र डॉक्टर व परिचारिका नसल्यामुळे ही रुग्णालये शोभेपुरती राहिली. अनेकदा उपचार होत नसल्याने नवी मुंबईतील रुग्णांना शहराबाहेर जावे लागत आहे. महापालिका सर्व बाबतीत तत्पर असताना नवी मुंबईतील रुग्ण उपचारासाठी शहराबाहेर जाणे हे महापालिकेला शोभनीय नाही. यामुळे अखेर महापालिकेत नुकत्याच आलेल्या भाजपच्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींतर्फे आरोग्याबाबत एकात्मिक धोरण मांडण्यात आले.
नागरिकांना परवडणाऱ्या व अत्याधुनिक आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने एकात्मिक आरोग्य सुविधा व व्यवस्थापन धोरण, २०२६ निश्चित केले आहे. या धोरणांतर्गत पालिकेचे ऐरोली सर्वसाधारण रुग्णालय स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे एका अनुभवी खासगी संस्थेमार्फत प्रायोगिक तत्त्वावर चालवले जाणार आहे. स्थानिकांना त्वरित आणि उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
‘फोर्टीज हिरानंदानी’च्या आरक्षित खाटांचा योग्य वापर
सध्या महापालिकेचा फोर्टीज हिरानंदानी रुग्णालयासोबत ८०० खाटा आरक्षित ठेवण्याचा करार आहे. अनेकदा या सर्व खाटा भरल्या जात नाहीत किंवा इतर गरजू रुग्णांना त्या वेळेवर मिळत नाहीत. या समस्येवर तोडगा म्हणून अशा खाटांवरील रुग्णांवर उपचार झाल्यानंतर पुढील शुश्रूषेसाठी (पोस्ट-केअर) त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात हलवले जाईल. यामुळे फोर्टीज हिरानंदानी रुग्णालयातील मोफत खाटांच्या सवलतीचा जास्तीत जास्त रुग्णांना प्रत्यक्ष फायदा मिळू शकेल.
गुणवत्ता, स्वच्छता आणि रुग्णकेंद्रित सेवांवर भर
रुग्णालय खासगी संस्थेकडे सोपवतानाच सेवेचा दर्जा राखण्यासाठी विशिष्ट मानके निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये स्वच्छता, संसर्ग नियंत्रण, डॉक्टरांचे वर्तन, प्रतीक्षा कालावधी, पौष्टिक आहार आणि रुग्ण सुरक्षेचा समावेश आहे. रुग्णांच्या अभिप्रायावरून आणि सेवा गुणवत्ता निर्देशांकांवरून रुग्णालयाचे नियमित मूल्यमापन केले जाईल. उपचारांची अचूकता वाढवण्यासाठी टेलिमेडिसिन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे.
पाच टप्प्यांत नवे धोरण; पहिल्या टप्प्यात कमतरता अहवाल
हे संपूर्ण आरोग्य धोरण पाच टप्प्यांत राबवले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व पालिका रुग्णालयांचा कमतरता अहवाल तयार केला जाईल. त्याआधारे रिक्त पदे भरणे आणि वैद्यकीय उपकरणांची पूर्तता करण्याला प्राधान्य दिले जाईल.
आपत्कालीन ग्रीन कॉरिडॉर आणि मध्यवर्ती औषध पुरवठा
गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती किंवा अवयव प्रत्यारोपणाच्या प्रसंगी वाहतूक कोंडीचा अडथळा येऊ नये, म्हणून पोलिस व वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने ग्रीन कॉरिडॉरची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय सर्व रुग्णालयांमध्ये दर्जेदार औषधे, शस्त्रक्रिया साहित्य आणि निर्जंतुक बेडशीट-कपड्यांचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्रीय औषध भांडार आणि मध्यवर्ती धुलाईगृह स्थापन केले जाणार आहे. आर्थिक अडचणींमुळे किंवा योग्य सुविधांअभावी कोणताही नागरिक उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी महापालिकेने ही सर्वसमावेशक आरोग्यसेवा साखळी उभारण्याचे पाऊल उचलले आहे.
नवी मुंबई शहरातील नागरिकांना माफक आणि चांगल्या दर्जाच्या सुविधा एकाच छताखाली देण्यासाठी धोरण आणले आहे. सध्या या धोरणातील सर्वांनी मांडलेल्या सूचनांनुसार काम करण्यात येणार आहे. या धोरणामुळे शहरातील नागरिकांना चांगल्या उपचारासाठी शहराबाहेर जाण्याची वेळ येणार नाही.
- सागर नाईक, सभागृह नेते, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.