

दिशादर्शक फलक जीर्ण
नवी मुंबईत वाहनचालकांची गैरसोय
जुईनगर, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातून पनवेल, पुणे आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांच्या मार्गदर्शनासाठी सायन-पनवेल महामार्गावर उभारलेल्या दिशादर्शक नामफलकांची अवस्था जीर्ण झाली आहे. या फलकांवरील शहरांची आणि महत्त्वाच्या ठिकाणांची नावे पूर्णपणे पुसली गेल्याने हे फलक केवळ उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे विशेषतः नवख्या वाहनचालकांचा मोठा खोळंबा होत असून, हे फलक तातडीने पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
नवी मुंबई शहरातून बाहेर पडताना वाहनचालकांना पुढील मार्गाची माहिती मिळावी आणि कोणत्या दिशेने कोणत्या शहराकडे जाता येईल, याचे योग्य मार्गदर्शन व्हावे, या उद्देशाने सायन-पनवेल महामार्गावर विविध ठिकाणी मार्गदर्शक फलक उभारण्यात आले आहेत. मात्र कालांतराने देखभालीअभावी या फलकांची अवस्था खराब झाली आहे. फलकांवरील अक्षरे आणि नावे निघून गेल्याने तेथे फक्त फलकांचे सांगाडे दिसून येत आहेत. सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. या मार्गावर वाहने वेगाने धावत असल्याने वाहनचालकांना पुढील मार्गाची माहिती काही किलोमीटर आधी मिळणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत दिशादर्शक फलक महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, फलकांवरील नावेच स्पष्ट दिसत नसल्याने वाहनचालकांना त्याचा अपेक्षित फायदा मिळत नाही. विशेषतः या मार्गाची माहिती नसलेल्या नवख्या वाहनचालकांसाठी दिशादर्शक फलक अत्यंत उपयुक्त ठरतात. मात्र, सध्याच्या अवस्थेमुळे संबंधित ठिकाणांची नावे समजत नसल्याने चालकांना पुढील मार्गाबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सायन-पनवेल महामार्गावरील सर्व दिशादर्शक फलकांची पाहणी करून जीर्ण झालेल्या फलकांची दुरुस्ती करावी. तसेच फलकांवरील पनवेल, पुणे, गोवा आदी प्रमुख ठिकाणांची नावे आणि दिशादर्शक माहिती पुन्हा स्पष्ट, मोठ्या अक्षरांत व वाहनचालकांना सहज दिसेल अशा पद्धतीने रंगविण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
नवी मुंबईच्या सौंदर्यात बाधा
१. नवी मुंबई पालिका ही राज्यातील नावाजलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. शहरात प्रवेश करताना किंवा शहरातून बाहेर पडताना महामार्गालगत असलेले दिशादर्शक फलक जीर्ण अवस्थेत दिसणे शहराच्या सौंदर्याला आणि प्रतिमेला बाधा आणणारे असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
२. हे नामफलक राज्य महामार्ग विभागाच्या अखत्यारीतील असले तरी सीबीडी बेलापूर येथे नवी मुंबई महापालिकेची हद्द संपते त्या परिसरात हे फलक असल्याने त्यांची दुरवस्था शहराच्या प्रतिमेशी संबंधित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित विभागाची जबाबदारी असली तरी महापालिकेने या समस्येकडे दुर्लक्ष न करता संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून फलकांची दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.