पतीच्या उत्पन्नाच्या अंदाजाच्या आधारे महिलेला १० लाखांची पोटगी

पतीच्या उत्पन्नाच्या अंदाजाच्या आधारे महिलेला १० लाखांची पोटगी
Published on

कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द
पतीच्या उत्पन्नाच्या अंदाजाच्या आधारे महिलेला १० लाखांची पोटगी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : पतीच्या उत्पन्नाचा अंदाज लावून महिलेला १० लाख रुपयांची कायमस्वरूपी पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. तसेच, कौटुंबिक न्यायालयाला या प्रकरणावर सहा महिन्यांत नव्याने निर्णय घेण्याचे आदेश दिले आणि आपत्याच्या देखभालीसाठीची रक्कम मात्र तशीच ठेवली.
पती एक कुशल व्यक्ती असून त्याने जर्मनीमध्ये काम केल्यामुळे, त्याच्या उत्पन्नाचा योग्य तपशील उपलब्ध नसतानाही, कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांनी, पतीचे मासिक उत्पन्न एक लाख रुपये असल्याचा अर्थ काढल्याचे निरीक्षण न्या. भारती डांगरे आणि न्या. आशीष चव्हाण यांच्या खंडपीठाने नोंदवले. कोणताही पुरावा नसताना अंदाज बांधण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या दृष्टिकोनावरही नाराजी व्यक्त केली. पतीचे उत्पन्न किती आणि पत्नीची गरज काय? याबद्दल कोणताही पुरावा नसताना संबंधित न्यायाधीशांनी केवळ अंदाज लावून पोटगी मंजूर करणे योग्य नसल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. याच कारणास्तव हे प्रकरण नव्याने निर्णयासाठी कौटुंबिक न्यायालयाकडे परत पाठवले.
पतीचे उत्पन्न आणि पत्नीच्या गरजांचा तपशील विचारात घेऊन कायमस्वरूपी पोटगीची रक्कम निश्चित करताना निर्णय सहा महिन्यांत घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. कायमस्वरूपी पोटगीची रक्कम तसेच आपत्याच्या पोटगीची रक्कम निश्चित करण्यासाठी हे प्रकरण पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे परत पाठवणे आम्हाला योग्य वाटते. ही रक्कम अपीलकर्त्याच्या उत्पन्नाशी सुसंगत असणे आवश्यक असून त्याचे उत्पन्न आणि पत्नीची गरज याबद्दल कोणताही पुरावा नोंदीवर नसताना संबंधित न्यायाधीशांनी केवळ अंदाज लावल्याचा पुनरूच्चारही न्यायालयाने केला. 

प्रकरण काय?
पतीने क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. पत्नीने या प्रकरणात कोणताही बचाव न केल्यामुळे, न्यायालयाने घटस्फोट मान्य करून पतीला कायमस्वरूपी पोटगी म्हणून १० लाख रुपये देण्याचे आदेश दिले. तसेच, अपत्याच्या देखभालीसाठी दरमहा दहा हजार रुपये देण्याचा आदेशही दिला. या आदेशांना पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याच्या उत्पन्नाबाबत कौटुंबिक न्यायालयाने लावलेल्या अंदाजावर त्याने आक्षेप घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com