

बदलापूर पालिका मुख्यालयातच
नगरसेवकाला धक्काबुक्की
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल; ‘टक्केवारी’च्या आरोपाने खळबळ
बदलापूर, ता. ४ (बातमीदार) ः बदलापूर नगर परिषदेच्या मुख्यालयातच शिवसेना शाखाप्रमुख तथा ठेकेदार भरत नवगिरे आणि भाजपचे नगरसेवक, नियोजन समितीचे सभापती संभाजी शिंदे यांच्यात कामांच्या बिलांवरून झालेल्या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली.
रखडलेली कामांची बिले मंजूर करून घेण्यासाठी शुक्रवारी (ता. ४) दुपारी नवगिरे पालिकेत आले. या वेळी बिलांवरून शिंदे यांच्यासोबत त्यांचे वाद झाले. त्यानंतर या वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. याच वेळी झालेल्या धक्क्यात संभाजी शिंदे हे पालिकेच्या आवारातील जिन्यावरून खाली कोसळल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी प्रसंगावधान राखत त्यांना सावरले. या घटनेत शिंदे यांना दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.
कामांची बिले मंजूर करण्यासाठी २५ ते ५० टक्के ‘टक्केवारी’ची मागणी केली जात असल्याचा आरोप ठेकेदार भरत नवगिरे यांनी केला आहे. राजकीय वैमनस्यातून आपली पालिकेतील कामांची बिले जाणीवपूर्वक रखडवली जात असून, विविध समित्यांच्या सभापतींकडून टक्केवारीची मागणी होत असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. दुसरीकडे, संभाजी शिंदे यांनी हे आरोप खोडसाळ असल्याचे सांगत, आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. नवगिरे यांच्याकडून करण्यात येणारी काही कामांची बिले ही खोटी असून, त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे बिलांवरील कथित टक्केवारीच्या आरोपांसोबतच खोटी बिले, ठेकेदारी आणि पालिकेतील राजकीय संघर्षाचा मुद्दाही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.
--------------------
पालिकेतील रखडलेल्या बिलांबाबत विनंती करण्यासाठी मी सभापती संभाजी शिंदे यांच्याकडे गेलो होतो. बिले मंजूर करण्यासाठी २५ ते ५० टक्के टक्केवारी मागितली जात असल्याचा माझा आरोप आहे. संताप अनावर झाल्याने त्यांना धक्काबुक्की झाली, ही बाब मी नाकारत नाही; मात्र या संपूर्ण प्रकरणाचे सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. पालिकेतील रखडलेली ठेकेदारांची बिले लवकरात लवकर अदा करून ठेकेदारांना न्याय मिळावा.
- भरत नवगिरे, शिवसेना पदाधिकारी (ठेकेदार)
----------------
भरत नवगिरे यांनी केलेले आरोप अत्यंत खोडसाळ आहेत. आम्ही टक्केवारीची मागणी केली असेल तर त्यांनी त्याचे पुरावे सादर करावेत. त्यांनी मला धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला असून, या घटनेत मला दुखापत झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. पालिकेच्या पैशांचा गैरवापर होऊ नये आणि खोटी बिले मंजूर होऊ नयेत, यासाठी आम्ही भूमिका घेतली आहे.
- संभाजी शिंदे, नियोजन समिती सभापती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.