

मैदानावर पदकांची कमाई
रस्त्यावर उदरनिर्वाहाची लढाई; पराग पाटलांच्या वाट्याला संघर्ष
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ६ : शहर गाढ झोपेत असताना पराग पाटील क्रीडा सरावासाठी मैदान गाठतात. धावणे, लांब उडी, तिहेरी उडी... शरीराची कमाल ताकद पणाला लावत त्यांचा सराव सुरू होतो. काही तासांनी मात्र हेच हात ‘उबेर’च्या स्टेअरिंगवर असतात. देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल २२ पदकांची कमाई करणारा हा खेळाडू कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी दिवसभर मुंबई-ठाण्याच्या रस्त्यांवर गाडी चालवतो. पदकांच्या झगमगाटामागील पराग यांचा जगण्यासाठीचा हा संघर्ष दुर्लक्षितच आहे.
पराग पाटील गेल्या चार दशकांपासून ॲथलेटिक्सशी जोडलेले आहेत. वयाच्या ३०व्या वर्षांपासून त्यांनी ज्येष्ठ खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली. पुण्यात २०१० मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ खेळाडू ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत तीन रौप्यपदकांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय पदकांच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर इटली, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि मलेशियातील स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या नावावर चार सुवर्ण, १२ रौप्य आणि सहा कांस्य अशी २२ आंतरराष्ट्रीय पदके आहेत. ६०, १०० आणि २०० मीटर धावणे, लांब उडी आणि तिहेरी उडी या प्रकारांत त्यांनी कामगिरी केली आहे.
जगण्याची शर्यत
पराग पाटील यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून विविध स्पर्धांसाठी त्यांना विमानप्रवास, नोंदणी, निवास, स्थानिक प्रवास, सराव आणि आहार यांचा खर्च स्वतःच करावा लागतो. महागडा प्रथिनयुक्त आहार, व्यायामशाळा आणि अत्याधुनिक प्रशिक्षणाची साधने घेणे त्यांना शक्य होत नाही. या स्पर्धांचा खर्च भागवण्यासाठी त्यांच्या पत्नीने दागिने गहाण ठेवले; मंगळसूत्राचाही त्याग करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. त्या मेकअप कलाकार म्हणून काम करतात. तर पाटील यांचा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.
हवा आहे मदतीचा हात
२०२५ मध्ये ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे झालेल्या ज्येष्ठ खेळाडूंच्या स्पर्धेत पराग यांनी लांब उडी आणि तिहेरी उडीत सुवर्ण, ६० मीटरमध्ये रौप्य, तर १०० आणि २०० मीटरमध्ये कांस्य अशी पाच पदके पटकावली. आता पुन्हा एकदा त्यांना ऑस्ट्रेलियाची हाक आली आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या पॅन पॅसिफिक ज्येष्ठ खेळाडूंच्या क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची नोंदणी झाली आहे. ६०, १०० आणि २०० मीटर धावणे, लांब उडी आणि तिहेरी उडी अशा पाच प्रकारांत ते सहभागी होणार आहेत. २२ पदकांनंतर किमान २५ पदकांचा टप्पा गाठण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांचे अंतिम लक्ष्य मात्र भारतासाठी १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्याचे आहे. या स्पर्धेसाठी प्रवास, नोंदणी, निवास, आहार आणि इतर खर्च मिळून सुमारे सहा ते सात लाख रुपयांची गरज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मदतीचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.