सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रुग्णालयांत ‘थ्री टेस्ला’ एमआरआय

सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रुग्णालयांत ‘थ्री टेस्ला’ एमआरआय
Published on

सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रुग्णालयांत ‘थ्री टेस्ला’ एमआरआय
नायर, सायन, कूपरमध्ये यंत्रे दाखल; केईएममध्येही लवकरच नवे मशीन
मुंबई, ता. ७ :  तब्बल सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि ११ वेळा फेरनिविदा काढल्यानंतर मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक तीन टेस्ला एमआरआय यंत्रणा  बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 
नायर, सायन आणि कूपर रुग्णालयांत मशीन दाखल झाल्या असून, त्यांच्या स्थापनेचे काम सुरू आहे. लवकरच केईएम रुग्णालयातही नवीन एमआरआय यंत्र दाखल होणार आहे. त्यामुळे एमआरआय तपासणीसाठी लागणारा वेळ कमी होण्याबरोबरच निदान अधिक अचूक होण्याची अपेक्षा आहे.
महापालिकेच्या केईएम, सायन आणि नायर रुग्णालयांमध्ये एमआरआय मशीन  बसविण्याचा प्रस्ताव २०१८-१९ पासून प्रलंबित होता. मात्र, निविदा प्रक्रियेत वारंवार अडथळे आल्याने प्रकल्पाला विलंब झाला. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर झाला. 
केईएम रुग्णालयात एमआरआय तपासणीसाठी सुमारे नऊ महिन्यांची प्रतीक्षा असल्याचे सांगण्यात येते. तर नायर रुग्णालयातील जुने यंत्र बंद पडल्याने सुमारे दोन वर्षांपासून एमआरआय सेवा ठप्प आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी केंद्रे किंवा महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी जावे लागत होते. दरम्यान, केईएम रुग्णालयाचे एमआरआय मशीनही अनेकदा बंद असते. 

अधिक स्पष्ट प्रतिमा मिळणार
नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि प्रमुख पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले, की  तीन टेस्ला क्षमतेचे एमआरआय यंत्र हे सध्या वापरात असलेल्या १.५ टेस्ला यंत्राच्या तुलनेत अधिक स्पष्ट आणि उच्च गुणवत्तेच्या प्रतिमा देऊ शकते. त्यामुळे शरीरातील अतिशय लहान बदल, गाठी किंवा आजाराची सुरुवातीची लक्षणे शोधणे तुलनेने सोपे होते. विशेषतः मेंदूशी संबंधित आजारांच्या निदानासाठी या यंत्राचा फायदा होऊ शकतो. अपस्माराच्या (एपिलेप्सी) रुग्णांच्या मेंदूमधील सूक्ष्म बदल किंवा लहान जखमा अधिक स्पष्टपणे दिसण्याची शक्यता असल्याने उपचाराचे नियोजन करणे सोपे होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com