सर जे. जे. त ३०१ रोबोटिक शस्त्रक्रियांचा टप्पा

सर जे. जे. त ३०१ रोबोटिक शस्त्रक्रियांचा टप्पा
Published on

सर जे. जे. त ३०१ रोबोटिक शस्त्रक्रियांचा टप्पा
‘उत्कृष्टता केंद्र’ म्हणून मान्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया सेवा सुरू करण्याच्या उपक्रमाला वर्षभरात महत्त्वाचे यश मिळाले आहे. रुग्णालयात एप्रिल २०२५ पासून आतापर्यंत ३०१ रोबोटिक सहाय्यित शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या कामगिरीची दखल घेत रुग्णालयाला ‘उत्कृष्टता केंद्र’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
रोबोटिक शस्त्रक्रिया कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्याचा विस्तार केवळ एका विभागापुरता मर्यादित न राहता जनरल सर्जरी, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जरी, युरोलॉजी तसेच प्रसूती व स्त्रीरोग विभागांपर्यंत झाला आहे. त्यामुळे, विविध आजारांसाठी शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना शासकीय व्यवस्थेतच आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
रोबोटिक पद्धतीत शल्यचिकित्सकांना शस्त्रक्रियेच्या भागाचे त्रिमितीय आणि मोठे दृश्य मिळते. उपकरणांच्या हालचालींवर अधिक अचूक नियंत्रण ठेवता येत असल्याने शरीराच्या अवघड भागांमध्येही सूक्ष्म शस्त्रक्रिया करणे शक्य होते. अनेक शस्त्रक्रिया कमी चिरांमधून केल्या जात असल्याने रुग्णाच्या रुग्णालयातील वास्तव्याचा कालावधी, वेदना आणि पुनर्वसनाचा कालावधी कमी होण्यास मदत होऊ शकते.

विविध विभागांचा सहभाग
रुग्णालयाच्या रोबोटिक कार्यक्रमात विविध विभागांतील शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, परिचारिका, शस्त्रक्रिया कक्षातील कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा समन्वय आहे. अधिष्ठाता व प्राध्यापक डॉ. अजय भंडारवार यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची उभारणी करण्यात आली. जनरल सर्जरी विभागाच्या पथकात डॉ. अजय भंडारवार, डॉ. गिरीश बक्षी आणि संपूर्ण टीमचे योगदान आहे. यासह शस्त्रक्रियेदरम्यान भूल व्यवस्थापनासाठी डॉ. उषा बडोले आणि त्यांच्या पथकाची भूमिका महत्त्वाची आहे. शस्त्रक्रिया कक्ष आणि परिचारिका कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून या सेवा राबविल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com