एक्स्प्रेस वेवर चढताना वाहनचालकांची कसरत!

एक्स्प्रेस वेवर चढताना वाहनचालकांची कसरत!
Published on

महामार्गावर प्रवेश करताना वाहनचालकांची कसरत
कळंबोली लोह-पोलाद बाजारातील शंभर मीटरचा रस्ता खड्ड्यात; गणेशोत्सवापूर्वी दुरुस्तीची गरज
पनवेल, ता. ९ (बातमीदार) : मुंबई-पुणे महामार्गावर प्रवेश करण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कळंबोली लोह-पोलाद बाजारातील १५० मीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, वाहतूक कोंडी होत आहे.
कळंबोली लोह-पोलाद बाजारातील पाच नंबर वाहनतळाशेजारी असलेल्या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने तसेच लहान वाहने ये-जा करतात. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे यामध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खोलीचा अंदाज येत नाही. यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, खड्ड्यातून मार्गक्रमण करताना वाहने सावकाश चालवावी लागत असल्याने या ठिकाणी कोंडी होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. आगामी गणेशोत्सवात या मार्गिकेवर वाहनांची वर्दळ वाढणार असल्याने प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून मार्गिका वाहतुकीसाठी सुरक्षित करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित यंत्रणांकडे विचारणा केली असता, सिडको, पनवेल पालिका आणि लोह-पोलाद बाजार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हा भाग आपल्या हद्दीत येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अवघ्या सुमारे दीडशे मीटरच्या रस्त्याची दुरुस्ती कोण करणार, असा प्रश्न वाहनचालक आणि नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. तीनही आस्थापनांकडून जबाबदारी झटकली जात असल्याने रस्त्याची दुरुस्ती रखडली आहे.

गणेशोत्सवात वाहतूक वाढणार
कळंबोलीतील या मार्गिकेचा वापर तळोजा औद्योगिक वसाहत, ठाणे, मुंब्रा, कल्याण, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात करतात. तसेच, लोह-पोलाद बाजार आणि सायन-पनवेल महामार्गावरील टोल टाळण्यासाठी रोडपालीमार्गे येणारी वाहनेही याच मार्गिकेतून मुंबई-पुणे मार्गावर प्रवेश करतात. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. दरम्यान, गणेशोत्सव जवळ आला असून, या काळात मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातून कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

हद्द नसतानाही आयआरबीकडून खड्डे बुजविण्याचे आश्वासन
या रस्त्याची दुरवस्था मुंबई-पुणे महामार्गाचे अभियंता राकेश सोनवणे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून, संबंधित रस्ता त्यांच्या हद्दीत नसतानाही त्यांनी सकारात्मक भूमिका घेत आयआरबीमार्फत या ठिकाणचे खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील खड्डे बुजविले गेल्यास वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com