खत केंद्रांवर सर्व्हर डाऊन; शेतकरी हैराण

खत केंद्रांवर सर्व्हर डाऊन; शेतकरी हैराण
Published on

खत केंद्रांवर सर्व्हर डाऊन; शेतकरी हैराण
विक्री ऑफलाइन पद्धतीने करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी
पेण, ता. ९ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील पेण तालुका भाताचे कोठार म्हणून ओळखला जात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. सध्या पिकाच्या वाढीसाठी युरिया व अन्य पूरक खतांची गरज असल्याने शेतकरी खत खरेदीसाठी केंद्रांवर गर्दी करीत आहेत, मात्र कृषी विभागाची ऑनलाइन खतविक्री व्यवस्था वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने शेतकऱ्यांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे शेतीची कामे बाजूला ठेवून खतासाठी केंद्रांवर रांगा लावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार खतविक्रीत पारदर्शकता राहावी आणि प्रत्येक शेतकऱ्याला नियमानुसार खत उपलब्ध व्हावे, या उद्देशाने रायगडसह काही जिल्ह्यांत ऑनलाइन खतविक्री सुरू करण्यात आली आहे, मात्र प्रत्यक्षात सर्व्हरमध्ये वारंवार तांत्रिक अडथळे येत असल्याने या व्यवस्थेचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतीच्या महत्त्वाच्या टप्प्यात शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी उर्वरित शेतकऱ्यांना ऑफलाइन पद्धतीने खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पेण तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांनी केली आहे.
पेण तालुक्यात सुमारे २५ परवानाधारक खतविक्रेते आहेत. त्यापैकी काही विक्रेत्यांनी ऑनलाइन प्रक्रियेतील अडचणींमुळे केंद्रांवर खत विक्रीसाठी उपलब्ध न ठेवल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची मागणीही म्हात्रे यांनी केली आहे. येत्या आठ दिवसांत शेतीसाठी आवश्यक खत उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

८० टक्के खतखरेदी पूर्ण
पेण तालुक्यातील जवळपास ८० टक्के शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या टप्प्यातच ऑफलाइन पद्धतीने खतखरेदी पूर्ण केली आहे. आता सुमारे २० टक्के शेतकऱ्यांची खतखरेदी बाकी आहे, मात्र मंगळवारी (ता. ८) दिवसभर सर्व्हर डाऊन असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. शिवसेना ठाकरे गटाने केलेल्या ऑफलाइन खतविक्रीच्या मागणीचे निवेदन वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येईल, अशी माहिती कृषी अधिकारी सागर वाडकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com