‘रिंग मेट्रो’वर प्रतिप्रश्न!

‘रिंग मेट्रो’वर प्रतिप्रश्न!
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : ठाणे रिंग मेट्रोला नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाची धार वाढत असतानाच आता प्रशासनानेही समाज माध्यमाच्या माध्यमातून थेट काउंटर करण्यास सुरुवात केली आहे. ‘रिंग मेट्रो नको’ म्हणणाऱ्या ठाणेकरांच्या आक्षेपांनाच व्हिडिओच्या माध्यमातून पुढे करत अखेरीस ‘का नको?’ असा सवाल प्रशासनाने उपस्थित केला आहे. वाहतूक कोंडीचे वास्तव दाखवत रिंग मेट्रो ठाण्याच्या भविष्यासाठी का आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न या चित्रफितीत करण्यात आला आहे.

वाहतूक कोंडीला जालीम उपाय म्हणून ठाणे शहरात अंतर्गत मेट्रो प्रकल्प रेटून घेण्याचा प्रयत्न होत आहे. बारा हजार कोटींचा हा प्रकल्प असून त्याला विरोध करण्यासाठी ठाणेकर एकवटले आहेत. मेट्रोविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता हा प्रकल्प किती फायदेशीर आहे, हे प्रशासनाकडून पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाने त्यासाठी सुमारे एक मिनिटांचा व्हिडिओ बनवून तो समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे.

दरम्यान, रिंग मेट्रोविरोधकांकडून प्रकल्पाच्या खर्चाबरोबरच पर्यावरण आणि वाहतूक नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रस्तावित मार्गामुळे होणारी वृक्षतोड, बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन आणि आधीपासूनच कोंडीने त्रस्त असलेल्या रस्त्यांवर बांधकामाचा होणारा परिणाम याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ वाहतूक कोंडीचे चित्र दाखवून मेट्रोची गरज पटवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न कितपत प्रभावी ठरतो, याकडे आता लक्ष लागले आहे.


नागरिकांच्या आक्षेपांनी सुरुवात
या व्हिडिओची सुरुवातच नागरिकांच्या आक्षेपांनी होते. ‘आधीची कामे पूर्ण करा’, ‘१२ हजार कोटींचा खर्च कशाला?’, ‘पर्यावरणाचे काय?’, ‘ट्रॅफिक आणखी वाढेल’, ‘ठाण्याची वाट लागणार’, ‘अजिबात नको ही मेट्रो!’ असे सवाल त्यात मांडण्यात आले आहेत. त्यामुळे विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणारे प्रमुख मुद्दे प्रशासनानेच व्हिडिओत समोर आणले आहेत. मात्र, यानंतर व्हिडिओचा सूर बदलतो. ठाण्यातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी लागणारा वेळ दाखवत ‘का... नको?’ असा प्रतिप्रश्न करण्यात आला आहे.

वाहतूक व्यवस्थेला बळ
वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील वाहतुकीवरील ताणही वाढत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज असल्याचे यातून अधोरेखित करण्यात आले आहे. २९ किमीच्या या रिंग मेट्रो मार्गावर २२ स्थानके प्रस्तावित आहेत. सुमारे १२ हजार २०० कोटींचा हा प्रकल्प ठाण्याच्या विविध भागांना जोडणार आहे. घोडबंदर रोड, वागळे इस्टेटसह शहरातील महत्त्वाच्या भागांना जोडणी मिळाल्यास रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, असा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

कमेंट्समध्येही विरोधाचा सूर कायम
प्रशासनाने रिंग मेट्रोची गरज पटवून देण्यासाठी समाज माध्यमांचा आधार घेतला असला तरी व्हिडिओखालील ठाणेकरांच्या प्रतिक्रियांमध्ये विरोधाची धार कायम असल्याचे दिसते. आधीची कामे पूर्ण करा, शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करा यावर अनेकांनी भर दिला आहे. काही नागरिकांनी रिंग मेट्रोच्या खर्चावर आणि नियोजनावर आक्षेप घेत प्रशासनाला जाब विचारला आहे. प्रशासन आणि स्थानिक राज्यकर्त्यांच्या भूमिकेवरही काही प्रतिक्रियांमधून टीका करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com