

ठाणे, ता. १० (बातमीदार) : यंदाचा गणेशोत्सव भक्तांसाठी विशेष ठरणार आहे. तब्बल १७ वर्षांनंतर हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी हे दोन्ही धार्मिक पर्व एकाच दिवशी येणार आहेत. सोमवारी (ता. १४) श्रीगणपतींचे आगमन होणार असून याच दिवशी हरतालिका पूजनही करता येणार आहे. त्यामुळे महिलांच्या हरतालिका व्रतासह गणेशभक्तांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया समाप्त होऊन भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुरू होणार आहे. सूर्योदयाच्या वेळी तृतीया तिथी असल्याने त्या दिवशी हरतालिका पूजन करायचे आहे, तर मध्यान्हकाळी चतुर्थी तिथी असल्यामुळे त्याच दिवशी श्रीगणेशमूर्तीची स्थापना आणि पूजन करता येणार आहे. यापूर्वी २०००, २००६ आणि २००९ मध्ये हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्या होत्या. आता तब्बल १७ वर्षांनंतर हा योग जुळून आला आहे. यानंतर पुन्हा २०३२ मध्ये हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येणार असल्याचे सोमण यांनी सांगितले.
पूजा करण्याच्या वेळांबाबत संभ्रम नको
हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी ही दोन्ही स्वतंत्र व्रते असल्याने त्यांच्या पूजाविधीच्या वेळेबाबत भाविकांनी संभ्रम बाळगण्याची गरज नाही. तृतीया सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी संपत असली तरी सूर्योदयापासून मध्यान्हकाळापर्यंत हरतालिका पूजन करता येईल. त्यामुळे दुपारी एक वाजून ४८ मिनिटांपर्यंत हरतालिका पूजा करण्यास हरकत नसल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले. हरतालिकेचा उपवास मंगळवारी (ता. १५) सोडायचा आहे. एखाद्या व्यक्तीने ऋषिपंचमीचे व्रतही करायचे असल्यास अन्नाचा वास घेऊन हरतालिकेचा उपवास सोडता येईल आणि त्यानंतर ऋषिपंचमीचे व्रत सुरू ठेवता येऊ शकते.
गणेशमूर्ती स्थापनेसाठी मध्यान्हकाळ महत्त्वाचा
१४ सप्टेंबर रोजी मध्यान्हकाळात भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने त्याच दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. गणेशमूर्ती स्थापना आणि षोडशोपचार पूजनासाठी सकाळी ११ वाजून २१ मिनिटे ते दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपर्यंतचा मध्यान्हकाळ योग्य आहे. ही वेळ शक्य नसल्यास पहाटे उषःकालापासून मध्यान्हकाळ संपेपर्यंत, म्हणजे दुपारी १ वाजून ४८ मिनिटांपर्यंत गणेशमूर्ती स्थापना करून षोडशोपचार पूजा करता येईल, असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.