

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मासिक पाळीच्या काळातील तीव्र वेदना, पोटदुखी आणि वंध्यत्वाला अनेकदा केवळ हार्मोन्सशी संबंधित समस्या मानली जाते; मात्र एंडोमेट्रिओसिसच्या कारणांमध्ये जनुकीय घटकांचीही महत्त्वाची भूमिका असू शकते, असे देशातील महिलांवरील जनुकीय अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासात एंडोमेट्रिओसिसशी संबंधित २१ संभाव्य जनुकीय क्षेत्रांची ओळख करण्यात आली आहे. त्यामुळे या आजाराचे निदान आणि उपचार अधिक अचूक करण्यासाठी नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) परळ आणि इंग्लंडमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यास करण्यात आला. देशातील १८ केंद्रांमधून शस्त्रक्रियेद्वारे एंडोमेट्रिओसिसचे निदान झालेल्या महिला तसेच निरोगी महिलांचा अभ्यासात समावेश करण्यात आला. त्यांच्या जनुकीय माहितीचे विश्लेषण करून आजाराशी संबंधित संभाव्य जनुकीय घटकांचा शोध घेण्यात आला. ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. देशभरातील २,५२३ महिलांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये एंडोमेट्रियोसिसचे निदान झालेल्या १,२८८, तर नियंत्रण गटातील १,२३५ महिलांचा समावेश होता.
भारतीय महिलांमधील जनुकीय संकेत जगातील इतर लोकसंख्येपेक्षा काही बाबतीत वेगळे असू शकतात. त्यामुळे भारतीय महिलांमध्ये एंडोमेट्रिओसिसची कारणे आणि त्याची वाढ समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भविष्यात या जनुकीय संकेतांच्या आधारे आजाराचा धोका ओळखणे, लवकर निदान करणे आणि रुग्णाच्या गरजेनुसार उपचार ठरवणे शक्य होऊ शकते.
दीर्घकाळ राहणारा आजार
एंडोमेट्रिओसिस हा महिलांमध्ये दीर्घकाळ राहणारा आजार असून, त्यात गर्भाशयाच्या आतील आवरणासारखी ऊती गर्भाशयाबाहेर वाढतात. त्यामुळे तीव्र पाळीच्या वेदना, पोट व ओटीपोटात दुखणे तसेच गर्भधारणेत अडचणी निर्माण होऊ शकतात. उपलब्ध अंदाजानुसार जगभरात सुमारे २४.७ कोटी आणि भारतात सुमारे पाच कोटी महिला या आजाराने ग्रस्त आहेत.
व्यापक संशाेधनाची गरज
अभ्यासातून एंडोमेट्रिओसिसकडे केवळ हार्मोन्स किंवा जीवनशैलीशी संबंधित समस्या म्हणून न पाहता त्यामागील जनुकीय कारणांचाही विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. भविष्यात या दिशेने अधिक संशोधन झाल्यास आजाराची जोखीम लवकर ओळखून उपचाराचा मार्ग अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे.
भारतीय महिलांमध्ये आढळलेले काही आनुवंशिक संकेत इतर लोकसमूहांमध्येही दिसून आले आहेत. या निष्कर्षांमुळे दक्षिण आशियाई महिलांमध्ये एंडोमेट्रियोसिसची कारणे, आनुवंशिक जोखीम आणि लवकर निदान यावर पुढील संशोधनाला दिशा मिळेल.
- डाॅ. संध्या आनंद, अभ्यासाच्या प्रथम लेखिका
‘एंडोमेट्रियोसिस’च्या आनुवंशिक कारणांबाबत उपलब्ध संशोधनातील मोठा हिस्सा दक्षिण आशियाबाहेरील लोकसंख्येवर आधारित आहे. त्यामुळे भारतीय महिलांची आनुवंशिक विविधता लक्षात घेऊन करण्यात आलेला हा अभ्यास पुढील संशोधनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
- डॉ. राहुल के. गजभिये, अभ्यासाचे प्रमुख संशोधक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.