‘सिंटा’च्या नव्या कार्यकारिणीसाठी आज निवडणूक

‘सिंटा’च्या नव्या कार्यकारिणीसाठी आज निवडणूक
Published on

‘सिंटा’च्या नव्या कार्यकारिणीसाठी आज निवडणूक
मुंबई, ता. ११ : सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (सिंटा)मधील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर नव्या कार्यकारिणीसाठी उद्या (ता. १२) निवडणूक होणार आहे. सिंटाच्या १५पैकी आठ निवडून आलेल्या कार्यकारिणी सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर संघटनेतील परिस्थिती बदलली होती. त्यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने नव्याने निवडणूक जाहीर केली. या निवडणुकीला पूनम ढिल्लो यांच्या गटाने न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र नुकतेच दिंडोशी सत्र न्यायालयाने निवडणूक घेण्यास परवानगी दिल्याने आता निवडणूक प्रक्रिया पुढे जाणार आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणात एकदा निवडणूक प्रक्रिया घोषित झाल्यानंतर न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. मात्र निवडणूक झाल्यास तिचा निकाल प्रलंबित दाव्याच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी २६ ऑक्टोबरला ठेवण्यात आले आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी निवडणूक उद्याच होणार असल्याचे सांगितले. निवडून आलेली कार्यकारिणी अस्तित्वात नसल्याने सिंटाची सोशल मीडिया खाती निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत निलंबित करण्याची विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून, सिंटाची बँक खाती निकाल जाहीर होईपर्यंत गोठवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पूनम ढिल्लों यांच्या गटाने या निवडणुकीच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजला सिंटाची निवडणूक घेण्याचा अधिकार नसल्याचे त्यांचे म्हणणे असून, संघटनेच्या घटनेनुसार बाहेरील संस्थेला ही प्रक्रिया राबवता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, उपासना सिंग यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत निवडणुकीला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, निवडणुकीनंतरचा निकाल आणि त्यासंदर्भातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया, याकडेही सर्वांचे लक्ष राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com