

मुंबई, ता. १३ : जागतिक उद्योजकता परिसंस्थेत मुंबई विद्यापीठाने उत्कृष्ट कामगिरी करत, ‘पिचबुक’च्या २०२६ मधील ‘टॉप १०० युनिव्हर्सिटीज फॉर एन्त्रप्रेन्योर्स’ या जागतिक क्रमवारीत मुंबई विद्यापीठाने ७४वे स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत स्थान मिळवणाऱ्या भारतातील आठ प्रमुख उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुंबई विद्यापीठाचा समावेश झाला असून, यात भारतातील क्रमवारीत मुंबई विद्यापीठाव्यतिरिक्त आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, दिल्ली विद्यापीठ आणि बिट्स पिलानी यांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमधून उद्योजकतेला मिळालेली चालना आणि जागतिक पातळीवर उभारलेल्या स्टार्टअप्सची व्याप्ती यामुळे मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जागतिक उद्योजकता क्रमवारीत स्थान प्राप्त करणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे. पिचबुकच्या २०२६च्या क्रमवारीनुसार, मुंबई विद्यापीठाशी संबंधित ३३९ संस्थापकांनी ३१६ कंपन्यांची उभारणी केली असून, या कंपन्यांनी तब्बल १२.९ अब्ज अमेरिकी डॉलरचे भांडवल उभारले आहे.
पिचबुकची ही क्रमवारी विद्यापीठांच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या आणि उद्यम भांडवल प्राप्त केलेल्या कंपन्यांच्या संख्येवर आधारित आहे. १ जानेवारी २०१५ ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत उद्यम भांडवल उभारलेल्या कंपन्यांच्या संस्थापकांचा या विश्लेषणात समावेश करण्यात आला आहे.
उद्योजकीय दृष्टिकोनाची प्रभावी साक्ष
जागतिक उद्योजकता क्रमवारीतील हे स्थान मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये रुजलेल्या नवकल्पना, नेतृत्वक्षमता आणि उद्योजकीय दृष्टिकोनाची प्रभावी साक्ष ठरत असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. नवकल्पनांना प्रोत्साहन देणे, कल्पनांना उद्योगात रूपांतरित करणे आणि विद्यार्थ्यांना रोजगारनिर्माते बनविणे यासाठी मुंबई विद्यापीठ आपली उद्योजकता परिसंस्था अधिक सक्षम करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.