सार्वजनिक शिक्षण संस्थेच्या सभागृहाचा नामकरण सोहळा

सार्वजनिक शिक्षण संस्थेच्या सभागृहाचा नामकरण सोहळा
Published on

सार्वजनिक शिक्षण संस्थेच्या सभागृहाचा नामकरण सोहळा
मुलुंड, ता. १५ (बातमीदार) ः सार्वजनिक शिक्षण संस्था मुलुंड येथील सभागृहात नामकरण सोहळा शनिवारी (ता. १२) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेच्या कार्याला आणि विकासाला मोलाचे योगदान देणारे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक देशपांडे यांच्या सन्मानार्थ संस्थेच्या सभागृहास ‘डॉ. विवेक देशपांडे सभागृह’, तर कलादालनास ‘डॉ. विवेक देशपांडे कलादालन’ असे नामकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व सार्वजनिक शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जोशी यांनी प्रास्ताविकातून डॉ. विवेक देशपांडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, दूरदृष्टीमुळे आणि संस्थेच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात संस्थेने केलेल्या प्रगतीचा विशेष उल्लेख केला.
प्रमुख पाहुणे आमदार संजय केळकर यांनी आपल्या मनोगतात शिक्षणव्यवस्था, शिक्षकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. “तुमची नीती जर साफ असेल तर नियतीदेखील साथ देते,” हा संदेश देत त्यांनी उपस्थितांना मूल्यनिष्ठ व प्रामाणिक वाटचालीची प्रेरणा दिली.
पद्मश्री उदय देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मल्लखांबासारख्या पारंपरिक क्रीडाप्रकारांचे महत्त्व स्पष्ट केले. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि शिस्त अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. संस्थेच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य व परिणामकारक वापर करण्यावर भर दिला. बदलत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि प्रगत करण्यासाठी संस्था भविष्यातही सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल सार्वजनिक शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह भास्कर डांगे यांनी सर्वांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com