

श्रीवर्धन नगर परिषदेत फायर बाइक वापराविना
नियोजन कुचकामी
श्रीवर्धन, ता. १५ (वार्ताहर) : शहरातील अरुंद रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी आगीच्या घटनांवेळी तातडीने पोहोचण्यासाठी श्रीवर्धन नगर परिषदेच्या अग्निशमन दलात २०२४ मध्ये दाखल करण्यात आलेली अत्याधुनिक ‘रॉयल एनफिल्ड फायर बाइक’ सध्या वापराविना पडून असल्याचे चित्र आहे. आवश्यक प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याने तसेच देखभाल व तांत्रिक अडचणींमुळे या बाइकचा अपेक्षित वापर होत नसल्याची माहिती समोर आली आहे.
आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाचे अवजड वाहन अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे वेळेत घटनास्थळी पोहोचू शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन ‘फर्स्ट रिस्पॉन्डर’ म्हणून फायर बाइक आणण्यात आली होती. या बाइकवर सुमारे ६० लिटर क्षमतेची हाय-प्रेशर वॉटर मिस्ट सिस्टीम, फोमसह अत्याधुनिक अग्निशमन उपकरणे बसवण्यात आली आहेत, मात्र ती हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता असून, नगर परिषदेकडे पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने बाइक सेवेत वापरली जात नव्हती.
दरम्यान, वेळेवर देखभाल न झाल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे बाइक नादुरुस्त अवस्थेत असल्याचेही सांगण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाइकचा प्रभावी वापर करण्यासाठी कॉल मॅनेजमेंट व वाहतूक कोंडीतील कार्यपद्धतीबाबतही नियोजन आवश्यक असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणलेली ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लवकरच सेवेत दाखल होणार
फायर बाइक प्रशासकीय कार्यकाळात आणण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ती वापरात नव्हती. सध्या यावर तोडगा काढण्यात आला असून, लवकरच फायर बाइक सेवेत दाखल होईल,’ असे नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.