

मराठा आरक्षण :
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देऊ नये
उच्च न्यायालयात जनहित याचिका; आज सुनावणी, पर्यायी जागा सुचवली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनासाठी मुंबईकडे कूच करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे आंदोलनास परवानगी देऊ नये, अशी मागणी सेवाभावी संस्थेच्या वतीने जनहित याचिकेतून बुधवारी (ता.१६) उच्च न्यायालयात करण्यात आली. त्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने गुरुवारी (ता. १७) सुनावणी सूचीबद्ध केली.
राज्यभरातून या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होऊ शकतात. त्यांची संख्या पाहता आझाद मैदान आंदोलनास पुरेसे नाही. त्यामुळे हे आंदोलन आझाद मैदानाऐवजी पर्यायी जागी मुख्यत्वे नवी मुंबईतील खारघर येथे करण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकाकर्त्या ॲमी फाउंडेशनने मुख्य न्यायाधीश महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाकडे केली. तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. न्यायालयाने त्यांची बाजू ऐकल्यानंतर प्रकरणाची सुनावणी गुरुवारी दुपारी तीन वाजता ठेवली. विशेष म्हणजे आझाद मैदान पोलिसांची जरांगे यांच्या आंदोलनाला अद्याप परवानगी मिळलेली नाही; तरीही जरांगे आंदोलनासाठी मुंबईला रवाना झाले असून, ते शनिवारी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
जरांगेंच्या आंदोलनाला कोणताही विरोध नसून, आझाद मैदानाऐवजी त्यांना पर्यायी जागा देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी याचिकेतून केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नवी मुंबईतील खारघर येथे आंदोलन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केली. मुंबईत सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अशातच हे आंदोलन आझाद मैदान येथे करण्यास परवानगी मिळाल्यास मागील वर्षीप्रमाणे आंदोलनादरम्यान सार्वजनिक मार्ग आणि सार्वजनिक जागेवर निर्बंध येतील.
गैरसोय करण्याचा अधिकार नाही
आंदोलनालामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होईल. सार्वजनिक मार्ग आणि जागा अशाप्रकारे आणि तेही अनिश्चित काळासाठी व्यापली जाऊ शकत नाही. असे आंदोलन करण्याचा कोणालाही अधिकार नाही. आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र त्यांना सर्वसामान्य जनतेची गैरसोय करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचेही फाउंडेशनकडून न्यायालयास सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.