

उल्हासनगरात डेंगीचा पहिला बळी
१७ वर्षीय युगचा उपचारादरम्यान मृत्यू
उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : उल्हासनगरातील लालचक्की परिसरातील युग कृष्ण धामणे (वय १७) याचा डेंगीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिले उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात आणि नंतर कल्याणमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर अवघ्या तासाभरात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक चारमधील लालचक्की येथील वीनस रोडवरील एका गृहसंकुलात युग कृष्ण धामणे हा आपल्या कुटुंबासह राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याला ताप येत होता. तापाची तीव्रता सतत कमी-जास्त होत असल्याने कुटुंबीयांनी त्याला स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले. यानंतर कुटुंबीयांनी त्याला गुनगीत या खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारांनंतरही त्याची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
युगचे वडील कृष्ण नामदेव धामणे यांनी त्याला तातडीने कल्याणमधील एका रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्रगत उपचार सुरू केले; मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने अवघ्या तासाभरात त्याचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने याबाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश खंकर यांनी रुग्णालयात जाऊन प्राथमिक चौकशी केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.