

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : शहरात वारंवार होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या शटडाऊनचा फटका आता नागरिकांच्या आरोग्यालाही बसू लागला आहे. कळवा पूर्वेतील डोंगरी भागात १० ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी साठवून ठेवावे लागत आहे. अनेक दिवस घरांमध्ये साठवून ठेवलेल्या या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असून, भास्करनगरसह पौडपाडा आणि वाघोबानगर परिसरात डेंगी आणि मलेरियाचा धोका वाढला आहे. तापाचे रुग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कळवा पूर्वेकडील भास्करनगर, पौडपाडा आणि वाघोबानगर हा डोंगरी भाग आहे. उंचावर असलेल्या या वस्त्यांमध्ये महापालिकेचे पाणी नियमितपणे पोहोचत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा बंद ठेवला जात असल्याने या भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र झाली आहे. पाणी आले की पुढील अनेक दिवसांची गरज भागविण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा करून ठेवत आहेत. या साठवलेल्या पाण्याच्या टाक्या, ड्रम आणि अन्य भांड्यांमध्ये डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढली आहे. परिसरातील अनेक नागरिकांना डेंगीची लागण झाल्याचे सांगण्यात येत असून, काही रुग्णांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर काहींवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. अनेक नागरिक तापाने फणफणत असून, काहींच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने डेंगीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माजी उपमहापौर गणेश साळवी यांनी या परिस्थितीकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरातून तापाचे २५ ते ३० रुग्ण त्यांनी स्वतः रुग्णालयात दाखल केले आहेत. डेंगी, मलेरिया संशयित हे रुग्ण आहेत. त्यांचे प्लेटलेटही कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरातील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेकडे केली आहे.
पाणीसाठा हटविण्याला नागरिकांचा विरोध
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने भास्करनगर परिसरात धूर फवारणी केली आहे. तसेच परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत, मात्र पाणीटंचाईमुळे नागरिकांना पाणी साठवणे भाग पडत असल्याने साठवलेले पाणी काढून टाकण्याच्या महापालिकेच्या उपाययोजनांना नागरिकांचा विरोध होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
आरोग्य विभागाकडून सूचना
पाणी साठवू नये, साठवलेले पाणी झाकून ठेवावे आणि पाण्याच्या भांड्यांमध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना आरोग्य विभागाकडून केल्या जात आहेत, मात्र अनेक दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांसमोर पाणी साठवण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पाणीटंचाईचा प्रश्न कायम
कळवा पूर्वेतील डोंगरी वस्त्यांमध्ये पाणीपुरवठ्याची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. उंचावरील वस्त्यांपर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. सध्या शहरात विविध कारणांमुळे पाणीपुरवठ्याचे शटडाऊन होत असल्याने या भागातील समस्या अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे डास नियंत्रणाबरोबरच या वस्त्यांमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.
ठाणे शहरात सध्या डेंगीचे ८०, तर मलेरियाचे १३६ रुग्ण आहेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून नियमित धूर फवारणी केली जात आहे. भास्करनगर परिसरातही धूर फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
- डॉ. प्रसाद पाटील,
मुख्य वैद्यकीय अधिकारी, ठाणे महापालिका
रुग्णसंख्या
डेंगी ८०
मलेरिया १३६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.