

मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरण
अभिनेता डिनो मोरियाची आठ तास चौकशी
आर्थिक गुन्हे शाखेकडून जबाब नाेंदवून सुटका
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २ : मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी बॉलीवूड अभिनेता डिनो मोरिया यांची शुक्रवारी (ता. २) आठ तास चौकशी करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोरियांचा जबाबही नोंदवला. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. तपासातून पुढे आलेल्या काही महत्त्वाच्या धागेदोऱ्यांच्या आधारे डिनो मोरियांची चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
शिवाजी पार्कमध्ये सीजेपीचे आंदोलन सुरू असतानाच डिनो मोरिया यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी पाचारण केले होते. याप्रकरणी समन्स बजावल्यानंतर मोरिया मुंबई पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले. चौकशीदरम्यान मिठी नदी गाळ काढण्याच्या कंत्राटासंबंधी काही कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आल्याचे समोर येत आहे. यापूर्वी मोरिया यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली होती.
महापालिकेने कोची स्थित मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून ‘स्लज पुशर्स’ आणि ‘ड्रेजिंग मशिन्स’ यांसारखी विशेष उपकरणे खरेदी करून मिठी नदीतील गाळ काढण्याचा मोठा प्रकल्प हाती घेतला होता. तपासादरम्यान मुख्य आरोपी केतन कदम आणि जय जोशी यांनी ‘मॅटप्रॉप’ आणि बीएमसीच्या ‘स्टॉर्म वॉटर ड्रेन्स’ (एडब्ल्यूडी) विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट देयके आणि वाढीव दर दाखवून ६५ कोटी रुपये हडपल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. त्याच वेळी मुख्य आरोपी केतन कदमच्या ‘कॉल डिटेल रेकॉर्ड्स’ (सीडीआर) मधून कदम, अभिनेता आणि त्याचा भाऊ यांच्यात अनेकदा संवाद झाल्याचे समोर आल्यानंतर या तपासात मोरियाचे नाव पुढे आले.
-----
आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय
वैयक्तिक ओळखीव्यतिरिक्त मोरिया आणि कदम यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. पोलिस या प्रकरणात अभिनेत्याचा काही सहभाग आहे का, याबाबत पडताळणी करीत आहेत. मुख्य आरोपींशी मोरियाचे नेमके कोणते व्यवहार होते आणि या कथित गैरव्यवहारात त्यांचा सहभाग काय आहे, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई पोलिस याव्यतिरिक्त प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत मनी लाँडरिंगच्या आरोपांवरून सक्तवसुली संचालनालयाकडूनही (ईडी) या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
...
चौकशी केल्यानंतर मोरिया यांना घरी जाण्याची परवानगी दिली. याप्रकरणी अधिक गरज पडल्यास कायद्यानुसार त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल.
- राजेश प्रधान, सहपोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.