जवळपास २० वर्षांनी आरोपीला जामीन

जवळपास २० वर्षांनी 
आरोपीला जामीन
Published on: 

औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण

जवळपास २० वर्षांनी
आरोपीला जामीन

खटल्याची संथ गतीवर न्यायालयाचे बाेट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : जवळपास २० वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शस्त्रसाठाप्रकरणी  अटक करण्यात आलेला आरोपी मुस्तफा महमूद सय्यद याला उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. त्याच्याविरुद्धच्या खटल्याचे कमकुवत स्वरूप, खटला सुरू होण्यापूर्वीचा दीर्घ कारावास आणि खटल्याची संथ गती या बाबी न्यायालयाने मुस्तफाला जामीन मंजूर करताना प्रामुख्याने विचारात घेतल्या.

कबुली जबाबात केवळ सय्यदला निधी आणण्यासाठी बांगलादेशात पाठवल्याचा उल्लेख होता. त्याव्यतिरिक्त त्याची कोणतीही सक्रिय भूमिका असल्याचे दिसून येत नाही, असे निरीक्षण न्या. सारंग कोतवाल आणि न्या. रणजितसिंह राजा भोंसले यांच्या खंडपीठाने नोंदवले. तसेच ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या एक किंवा दोन जामिनांवर सुटका करण्याचे आदेश दिले. खटला चालवणाऱ्या न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याला पासपोर्ट तपास अधिकाऱ्याकडे जमा करण्याचे आदेशही दिले आहेत.
९ मे २००६ राेजी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ७०-८० किमी पाठलाग करून दोन चारचाकी वाहने अडवली. त्यामधून १० एके-४७ रायफल्स, ४० मॅगझिन्स, दाेन हजार जिवंत काडतुसे आणि सुमारे ३० किलो आरडीएक्स जप्त केले. अहमदनगरचा (अहिल्यानगर) असलेल्या सय्यदला ९ ऑक्टोबरला २००७ अटक करण्यात आली होती. एका महिन्यानंतर त्याने सरकारी साक्षीदार बनण्याची तयारी दाखवून गुन्ह्याबद्दलची सर्व माहिती उघड करण्याच्या अटीवर विशेष न्यायालयाने त्याला सशर्त माफी दिली.
-------------------
खटल्यात १०० साक्षीदार बाकी
फेब्रुवारी २०१३ मध्ये अन्य आरोपींवर आरोप निश्चित झाले; मात्र सरकारी साक्षीदार असल्याने सय्यदचा समावेश नव्हता. ऑक्टोबरमध्ये त्याने सरकारी साक्षीदाराचा दर्जा सोडण्याची विनंती केली, ती फेटाळली. मार्च २०१५ मध्ये साक्ष देताना फितूर ठरल्याने त्याचा खटला वेगळा झाला. इतर आरोपींचा खटला २०१६ मध्ये संपला. सय्यदच्या खटल्यात चार साक्षीदार तपासले असून, आणखी सुमारे १०० साक्षीदार बाकी आहेत. त्यामुळे खटला लवकर संपण्याची शक्यता नाही, असा युक्तीवाद वकील मुबीन सोलकर यांनी उच्च न्यायालयात केला. २०२४ मध्ये त्यांनी याचिका दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com