

‘एसआयआर’ याचिकेवर तातडीच्या सुनावणीस नकार
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित; नावे वगळण्यास स्थगितीची मागणीही फेटाळली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : राज्यभरातील मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एसआयआर) प्रक्रियेविरोधातील वंचित बहुजन आघाडीने केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सोमवारी (ता. ५) उच्च न्यायालयाने नकार दिला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने तूर्तास सुनावणी घेता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
एसआयआर संबंधित याचिकेवर मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे सोमवारी सुनावणी पार पडली. त्या वेळी या एसआयआर प्रकरणांशी संबंधित विविध राज्यातील याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून, ८ ऑक्टोबरला त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे विविध उच्च न्यायालयांनी त्यांच्यासमोरील प्रकरणावर विचार करू नये (किंवा कार्यवाही करू नये) असे सर्वोच्च न्यायालयाने ११ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेले अंतरिम आदेश अद्यापि लागू आहेत, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने ॲड. आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्यास तूर्तास नकार दिला आणि सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली. या युक्तिवादाला याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश महाराष्ट्राला लागू होत नसून आपली याचिका वेगळी असल्याचे सांगण्याचाही प्रयत्न केला, मात्र समांतर कार्यवाही करणे हे न्यायालयीन शिष्टाचाराला धरून होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यावर पुढील सुनावणीपर्यंत एकाही मतदाराचे नावे मतदार यादीतून वगळण्यात येऊ नये, असा अंतरिम दिलासा देण्याची मागणी ॲड. आंबेडकर यांनी न्यायालयाकडे केली, मात्र त्यासही न्यायालयाने नकार दिला.
प्रकरण काय?
पात्र मतदारांची नावे एसआयआर प्रक्रियेत चुकीच्या पद्धतीने वगळण्याची शक्यता असल्याचे ‘वंचित’चे युवा अध्यक्ष सागर रमेश गवई आणि रफीक खान यांनी वकील हितेंद्र गांधींमार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यात एसआयआर प्रक्रिया राबवण्याबाबतचा आदेश आणि त्यामागील नोंदवलेली कारणे जाहीर करावी, या प्रक्रियेची कार्यपद्धती आणि कायदेशीर आधाराबाबत पारदर्शकता असावी आणि पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळू नये, अशी मागणीही याचिकेतून केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.