

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : नवरात्रोत्सवाच्या तयारीने ठाणे शहरातील बाजारपेठ सजू लागली असून, सार्वजनिक मंडळांकडून मंडप उभारणीसाठी महापालिकेच्या परवानगीची धावपळ सुरू झाली आहे. उत्सवाला काही दिवसच उरल्याने महापालिकेकडे आलेल्या अर्जांची संख्या २३७ वर पोहोचली आहे. यापैकी ८० मंडळांना मंडप उभारण्यास मंजुरी मिळाली असून, उर्वरित अर्जांवर प्रशासनाकडून छाननी सुरू आहे.
नवरात्रोत्सवात मंडपांसोबतच गरबा-दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्युत रोषणाईमुळे विविध भागांत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडपासाठी जागा निश्चित करताना वाहतुकीची कोंडी होणार नाही, पादचारी मार्ग अडविले जाणार नाहीत आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाला मार्ग मिळेल, याची महापालिका प्रशासनाकडून तपासणी केली जात आहे. मंडप परवानगीसाठी सर्वाधिक अर्ज लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीकडे आले आहेत. या भागातील ४५ मंडळांनी अर्ज केले असून, २२ मंडळांना परवानगी, तर नौपाडा परिसरातील १३ मंडळांना मंजुरी मिळाली आहे. दिव्यातही मंडप उभारणीसाठी मंडळांकडून प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, पालिकेकडे आलेल्या अर्जांपैकी ८० अर्ज ऑनलाइन, तर १५७ अर्ज ऑफलाइन पद्धतीने दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी करताना मंडपाची जागा, रस्त्याची रुंदी, वाहतुकीवरील परिणाम, विद्युत जोडणी आणि अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांचा विचार केला जात आहे. परवानगी मिळालेल्या मंडळांनी मंडप उभारणीची कामे सुरू करण्याची तयारी केली आहे. काही ठिकाणी सजावट, रोषणाई आणि गरबा-दांडिया कार्यक्रमांचे नियोजनही अंतिम टप्प्यात आले आहे.
अनधिकृत मंडपांवर कारवाईचा इशारा
उत्सवाच्या काळात रस्ते, पदपथ किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मंडपात अग्निशमन उपकरणे, सुरक्षित वीज व्यवस्था आणि आपत्कालीन मार्गाची सुविधा ठेवणे आवश्यक आहे. परवानगी न घेता मंडप उभारल्यास संबंधित मंडळांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
परिसर अर्ज
लोकमान्यनगर-सावरकरनगर ४५
कळवा २९
वर्तकनगर २२
वागळे १९
उथळसर १९
नौपाडा-कोपरी १८
मुंब्रा ६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.