

फुलांचा गणपती, साधे घर अन् मोठ्या मनाचा माणूस!
शेजाऱ्यांच्या आठवणीतील ‘नाना भाऊ’
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : रुपेरी पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मुंबईतील माहीम परिसरातील नव सहयोग इमारतीतील रहिवाशांमध्ये शोककळा पसरली आहे. नानांच्या संघर्षाची साक्षीदार असलेल्या या इमारतीत राहणाऱ्या अनेकांसाठी नाना हा स्टार नव्हे, तर आपुलकीने बोलणारा ‘नाना भाऊ’ होता. त्यामुळे आज ‘फुलांच्या गणपती’पासून अनेक आठवणी या रहिवाशांच्या मनात दाटून आल्या.
नव सहयोग इमारतीत दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ घालवला. उमेदीच्या काळात नाना कुटुंबासह येथे राहत होते. या सोसायटीतील सर्व रहिवाशांसोबत त्यांचे आत्मीय संबंध होते. नानांच्या घरचा गणपती आमच्या सोसायटीचे विशेष आकर्षण होते, असे शेजाऱ्यांनी सांगितले. फुलांनी सजविलेला गणपती पाहण्यासाठी दूरवरून नागरिक येत आणि दर्शनासाठी रांगा लावत. नाना स्वतः सजावटीत सहभागी होत असत. गणपती कव्हर करण्यासाठी प्रसारमाध्यमांची मोठी गर्दी होत असे. अनेकदा नानांना ते आवडत नसे. या काळात बहुतांश वेळ ते घरातच घालवत असत, असे शेजाऱ्यांनी सांगितले. तीन वर्षांपूर्वी कोविडमध्ये नानांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर नाना कुटुंबासह पुण्याला शिफ्ट झाले. आई जिवंत असेपर्यंत माहीमच्या घरात न चुकता गणपती बसायचा. पुण्याला गेल्यानंतर या इमारतीमधील त्यांचे येणे-जाणे कमी झाले. नानांचा मुलगा मल्हार याचेही सर्व रहिवाशांसोबत आपुलकीचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. कधी कधी गणपती, नवरात्र आणि गरब्याच्या निमित्ताने नानांचे कुटुंबीय यायचे, असे त्यांनी सांगितले. आई गेल्यानंतर नाना पाटेकर यांचे या घरी येणे-जाणे कमी असले, तरी या घराबद्दल, एकंदरीत सोसायटीबद्दल आत्मीयता कायम होती.
...
धक्का बसला ः विजयालक्ष्मी मेर
तब्बल ४० वर्षांपासून या सोसायटीत राहणाऱ्या विजयालक्ष्मी मेर यांचे नाना पाटेकर कुटुंबाशी कौटुंबिक संबंध होते. “नाना एकदम डाऊन टू अर्थ होते. एवढा मोठा कलाकार असल्याचे त्यांनी आम्हाला कधी जाणवू दिले नाही. आमच्यासाठी ते नाना भाऊ होते. ते आपल्यातून निघून गेले, ही बातमी ऐकून माझ्यासह सर्व सोसायटीतील रहिवाशांना खूप धक्का बसला,” असे विजयालक्ष्मी मेर यांनी सांगितले.
...
प्रत्येकाशी संवाद ः ऊर्मिला सिंह
या इमारतीच्या तळमजल्यावर राहत असलेल्या ऊर्मिला सिंह या नानांना गेल्या तीन दशकांपासून ओळखतात. नानांचे संपूर्ण कुटुंबच येथे राहत होते. प्रत्येकाशी त्यांचा संवाद असायचा, असे उर्मिला यांनी सांगितले. नानांचा उमेदीचा काळ या घरात गेल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
...
सेलिब्रिटी असूनही साधे ः सुनील शर्मा
सुनील शर्मा यांनी नानांच्या साधेपणाच्या आठवणी काढल्या. एवढे मोठे सेलिब्रिटी असूनही त्यांनी आमच्यावर त्यांच्या मोठेपणाचे दडपण कधीच जाणवू दिले नाही. येता-जाता दिसले की हात वर करून ते आम्हाला अभिवादन करायचे. त्यांचा मुलगा मल्हारही त्यांच्याएवढाच नम्र असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.