

थकीत वेतनामुळे कर्मचाऱ्याची दांडी
मृतदेह तीन तास रुग्णवाहिकेत; छाया उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार
अंबरनाथ, ता. ९ (वार्ताहर) : आयुध निर्माण संस्थेच्या परिसरात आढळलेल्या ६५ वर्षीय वृद्धाच्या कुजलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी आवश्यक मदतनीस कर्मचारी वेळेवर उपलब्ध न झाल्याने मृतदेह दोन ते तीन तास रुग्णवाहिकेतच ठेवण्याची वेळ आली. संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याचे वेतन वेळेवर आणि पूर्ण मिळत नसल्याने त्याने कामावर येण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे मृताच्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला असून, अंबरनाथच्या शासकीय छाया उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आयुध निर्माण संस्थेच्या परिसरात राहणाऱ्या या वृद्धाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी छाया उपजिल्हा रुग्णालयात आणला, मात्र बुधवारी (ता. ७) शवविच्छेदनासाठी आवश्यक मदतनीस कर्मचारी उपस्थित नसल्याने प्रक्रिया रखडली. परिणामी, मृतदेह बराच वेळ रुग्णवाहिकेतच ठेवावा लागला. मृतदेह रुग्णवाहिकेत बराच वेळ पडून असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते यश जगले यांनी रुग्णालयात धाव घेत प्रशासनाला जाब विचारला. त्यानंतर संबंधित कर्मचारी उपस्थित झाल्यावर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राम पाटील यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतनाची जबाबदारी शासननियुक्त कंत्राटदाराची असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर हे दोघेही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती नाही
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर या रुग्णालयात शवविच्छेदनगृह सुरू करण्यात आले आहे. रुग्णालयात सात डॉक्टर कार्यरत असले, तरी शवविच्छेदनासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याची कंत्राटी पद्धतीने या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, मात्र संबंधित कंत्राटदाराकडून वेतन वेळेवर आणि पूर्ण मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.