

मुंबई, ता. ११ : वन्यजीव आणि मानव यांच्यातील सहअस्तित्वाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या हिरव्यागार परिसरात ‘कोएक्झिस्टन्स’ ९ ऑक्टोबरला हा अनोखा छायाचित्रकला उपक्रम आणि सामाजिक प्रयोग राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या परिसरातील विविध अनपेक्षित ठिकाणी बिबट्या, पक्षी आणि अन्य वन्यप्राण्यांची आकारमानाने प्रत्यक्ष प्राण्यांसारखी दिसणारी छायाचित्रे लावण्यात आली आहेत.
वर्गात जाताना अचानक एखाद्या वन्यप्राण्याचे हुबेहूब छायाचित्र समोर आल्यास विद्यार्थी कशी प्रतिक्रिया देतात, ते थांबून पाहतात का, जवळ जातात का, छायाचित्र काढतात का किंवा त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातात का, याचे निरीक्षण या प्रयोगातून केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या या सहज आणि उत्स्फूर्त प्रतिक्रियांमधून मानवाची सार्वजनिक जागांविषयीची मानसिकता, वन्यजीवांविषयीची धारणा आणि निसर्गाशी असलेले नाते समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वन्यजीव संवर्धनाचा संदेश केवळ व्याख्याने किंवा वर्गातील चर्चांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यापीठाचा परिसरच शिकण्याचे माध्यम बनवून, अनपेक्षित प्रसंगातून वन्यजीव, त्यांचे अधिवास आणि मानवासोबतच्या सहअस्तित्वाविषयी विचार करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात आहे.
उपक्रमाचा मुख्य संदेश म्हणजे सहअस्तित्व आणि सजीवसृष्टीतील परस्परसंबंधांचे महत्त्व. आपण जैवविविधतेचे संवर्धन केले नाही, तर भविष्यात हे वन्यजीव आपल्याला केवळ छायाचित्रांच्या चौकटीतच पाहायला मिळतील. परिसरात वन्यजीवांची छायाचित्रे विद्यार्थ्यांनी थांबून पाहावीत, त्यांची छायाचित्रे काढावीत आणि त्याविषयी एकमेकांशी चर्चा करावी, अशी आमची अपेक्षा आहे.
- पार्वती जे. आर., संचालक, कॅशकॅड, सोमय्या विद्यापीठ
मुंबई : साेमय्या विद्यापीठाच्या परिसरात वन्यप्राण्यांची छायाचित्रे लावली आहेत.